आमदार नारायण पाटील यांनी नुकतीच करमाळा तालुक्यातील पाणी टंचाई आढावा बैठक घेतली. या बैठकीत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी प्रास्ताविकात थोढाक्यात माहिती दिली. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी शेख यांनी जलजीवन मिशनच्या कामाची माहिती दिली. त्यात तालुक्यातील ३० गावांची कामे पूर्ण झाली असल्याचे सांगितले. त्यावर उपस्थितांनी काम पूर्ण झालेली कोणती गावे आहेत विचारले. तेव्हा आळजापूरपासून त्यांनी गावाची नावे सांगायला सुरु केले. तोच आळजापूरचे सरपंच संजय रोडे आक्रमक झाले आणि आमच्या गावातील पाणी पुरवठा योजनेला विद्युत जोडणीचा नसल्याचे सांगत ही योजना बंद असल्याचे सांगितले. नागरिकांना विश्वासात न घेता हे काम झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर कार्यालयात बसून कागद रंगवलेल्या शेख यांची बोलती बंद झाली.
आळजापूरच्या प्रश्नावर चर्चा सुरु असतानाच पाडळीतही तीच स्थिती असल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले. जातेगाव येथील पाणी टाकीची स्थिती काय आहे हे सांगताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी ही माहितीच चुकीचे असल्याचे सांगितले. तरटगाव येथील नागरिकाने तर आमदार पाटील व तहसीलदार ठोकडे यांच्यापुढे दूषित पाण्याची बाटलीच ठेवली. विहाळ येथील महिला सरपंच यांनीही गावातील पाणी पुरवठ्याची स्थिती मांडली. एकास एक अशा तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या.
तक्रारीचा पाढा सुरु असताना पंचायत समितीचे माजी सदस्य ऍड. राहुल सावंत यांनी महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण योजनाची स्थिती मांडली. ते बोलत असतानाच सरपंच रोडे यांनी पुन्हा माईकचा ताबा घेऊन आमदार पाटील यांनी आम्हाला प्रश्न मांडण्यासाठी संधी दिली असल्याचे सांगत यापूर्वी अशी कधीही बैठक झाली नसल्याचे म्हणाले. पाणी पुरवठा विभागातील काही अधिकारी कार्यालयात न थांबता हॉटेलमध्ये थांबून कार्यालयीन कामकाज करत असल्याचा आरोप केला. काही अधिकाऱ्यांनी कसा कामचुकार केला आहे हे वास्तव समोर येत असतानाच शेवटी आमदार पाटील यांनी कामकाजात सुधारणा करा अशा सूचना वजा इशारा दिला.
यापूर्वीही लोकप्रतिनिधींनी अशा अनेक आढावा बैठका घेतल्या आहेत. पण कामचुकार अधिकाऱ्यांकडे कारणही तयार असतात. नागरिकांची कामे मात्र तशीच राहत आहेत. आमदार पाटील यांनी या बैठकीच्या निमित्ताने इशारा दिला खरा पण यातून सुधारणा होणार का? आणि आमदार पाटील हे पुन्हा असाच आढावा घेतील तेव्हा खरी माहिती समोर येईल का? हे पहावे लागणार आहे.