करमाळा (अशोक मुरूमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र ४१ पैकी तीन मतदान केंद्रावर बागल गटाची मते घटली आहेत. येथे प्रा. रामदास झोळ यांच्या मकाई परिवर्तन पॅनलला १०० च्यापुढे मतदान पडले आहे. यामध्ये बागल गटाच्या बाल्लेकिल्यातील पोथरेचाही समावेश आहे. या केंद्रात आळजापूरचेही मतदान आहे. मात्र तेथील बोटावर मोजण्याएवढे मतदान झाले आहे. ते मतदान झाले असते तर आणखी मतदान वाढले असते असा विरोधी गटाचा दावा आहे.
मांगी ऊस उत्पादक गट हा बागल गटाचा बालेकिल्ला आहे. येथे दिनेश भांडवलकर व अमोल यादव हे बागल गटाचे नूतन संचालक आहेत. सुभाष शिंदे हे प्रा. झोळ यांच्या पॅनलमध्ये उमेदवार होते. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न झाले, मात्र त्याला यश आले नाही. या गटात पोथरे येथे बागल गटाच्या उमेदवारांचे मताधिक्य जास्त आहे. मात्र इतर ठिकाणच्या तुलनेत मताची संख्या घटली असल्याचे दिसत आहे. भांडवलकर यांना २०७ व यादव यांना २०२ मते आहेत. शिंदे यांना १३१ मते आहेत. येथील १७ मते बाद झालेली आहेत.
बागल गटातून काही दिवसांपूर्वीच हरिभाऊ झिंजाडे यांनी भाजपात प्रवेश केला होता. या निवडणुकीत भाजप थेट रिंगणात नव्हते मात्र स्थानिक पातळीवर झिंजाडे व आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक शहाजी झिंजाडे, संतोष वाळुंजकर, किसन शिंदे, अशोक जाधव आदी मंडळीने बागल गटाला ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिंदे यांना १०० च्या पुढे मतदान झाले.
पारेवाडी ऊस उत्पादक गटात बागल गटाकडून रेवणनाथ निकत, संतोष पाटील व बाळासाहेब पांढरे हे उमेदवार होते. त्यांच्याविरुद्व गणेश चौधरी हे रिंगणात होते. चौधरी हे बागल गटाचेच बंडखोर उमेदवार आहेत. बागल गटाने उमेदवारी न दिल्याने ते रिंगणात उतरले होते. शिंदे गटाचे समर्थक वामनराव बदे यांनी त्यांच्यासाठी काम करून गाव आपल्याच ताब्यात असल्याचे दाखवून दिले आहे. उमरड येथे चौधरी यांना २३१ मते आहेत. तर निकत यांना १३४, पाटील यांना १२७ व पांढरे यांना १०८ मते मिळाली आहेत. येथे १३ मते बाद झाली आहेत. बदे हे सुरुवातीपासून प्रा. झोळ यांच्याबरोबर होते.
भिलारवाडी गटात बागल गटाकडून अजित झांजुर्णे व रामचंद्र हाके हे उमेदवार होते. विरोधी गटाकडून सुनीता गिरंजे व अप्पासाहेब जाधव हे उमेदवार होते. भगतवाडी येथे जाधव यांना १०० व गिरंजे यांना ९७ मते आहेत. ( चौधरी यांना ११४ मतदान आहे.). हाके यांना ९२ ते झांजुर्णे यांना १०० मते आहेत.