करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाने दणदणीत विजयी मिळवला आहे. १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत बागल गटाचे आठ उमेदवार बिनविरोध झाले होते. तर नऊ जगासाठी १४ उमेदवारांमध्ये सामना रंगला होता. त्यात बागल गटाचे सर्व उमेदवार विक्रमी मताने विजयी झाले असून विरोधी गटाचा दारुण पराभव झाला आहे. यामुळे बागल गटाला कारखान्यावर एकहाती सत्ता राखण्यात यश आले आहे.
करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखाना स्थापनेपासून बागल गटाच्या ताब्यात आहेत. या निवडणुकीत बागल गटाच्या विरुद्ध दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी पॅनल उभा केला होता. मात्र त्यांचे प्रमुख अर्ज अपात्र ठरल्याने या निवडणुकीतील चुरस संपली होती. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी पाच अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक लागली होती. त्याची मतमोजणी आज (रविवारी) यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे झाली. निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी झाली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार विजयकुमार जाधव व सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांनी काम पाहिले. यावेळी पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी बंदोबस्त ठेवला होता. पोलिस उपनिरीक्षक मिटू जगदाळे यांच्यासह सर्व पोलिस यावेळी उपस्थित होते.
मतमोजणी सुरु झाल्यापासूनच बागल गटाचे सर्व उमेदवार आघाडीवर होते. त्यामुळे पहिल्या फेरीतच निकालाचा अंदाज आला होता. या निवडणुकीत फारशी चुरस नसल्याने निकालासाठीही नागरिकांमध्ये उत्सुकता नसल्याचे जाणवत होते. पहिल्या फेरीचा कौल येताच बागल गटाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी हलगीच्या तालात आंनदोत्सव केला.
अशी आहे मताची आकडेवारी
भिलारवाडी ऊस उत्पादक गट (कंसातील आकडे मिळालेले मत) : सुनीता गिरंजे (१३२८), अप्पासाहेब जाधव (१२४९), अजित झांजुर्णे (८२६७) व रामचंद्र हाके (८१२९) . पारेवाडी ऊस उत्पादक गट : गणेश चौधरी (१५४६), रेवनाथ निकत (८३९०), संतोष पाटील (८३८३) व बाळासाहेब पांढरे (८०९४). मांगी ऊस उत्पादक गट : दिनेश भांडवलकर (८२५६), अमोल यादव (८१६६) व सुभाष शिंदे (१४५६). महिला राखीव गट : कोमल करगळ (८२७१), सुनीता गिरंजे (१४३५) व अश्विनी झोळ (८२३२).
रश्मी बागल मतदान केंद्रात
मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मतमोजणी सुरु असताना शेवटची म्हणजे तिसऱ्या फेरीची (फक्त एक मतदान केंद्र बाळेवाडी) मतमोजणी संपल्यानंतर बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी मतमोजणी कक्षात भेट दिली. त्यांनी तेथच विजयी झालेल्या नवनियुक्त सर्व संचालकांशी संवाद साधला. एका मतमोजणी टेबलावर मतमोजणीला उशीर होत होतात तेथेही त्यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याची सूचना दिली. त्यापूर्वी बागल गटाचे नेते दिग्विजयी बागल यांनीही मतदान मोजणी कक्षाला भेट दिली.
घुमरे सर जल्लोषात सहभागी
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाची खेळी यशस्वी झाली आहे. या निवणुकीत कोणीही प्रमुख नेते नव्हते. मात्र प्रचार साहित्यावर दिगंबररावजी बागल मामा, माजी आमदार शामलताई बागल, रश्मी बागल व दिग्विजयी बागल यांचे फोटो होते. त्याच पत्रिकेवर प्रकाशक म्हणून विलासराव घुमरे यांचे नाव होते. या निवडणुकीत बागल गटाचा विजयी निश्चित मानला जात होता. निकालानंतर झालेल्या जल्लोषात घुमरे सरही सहभागी झाले होते.
सर्व उमेदवारांनी घेतले एकत्रित प्रमाणपत्र
अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी टोंपे यांनी विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र दिले. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते. यांच्यासह नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड उपस्थित होते.
सत्ताधारी- विरोधी गट आमने- सामने
मतमोजणीवेळी सकाळी सत्ताधारी पहिल्या फेरीचे मतदान मोजणी सुरु असताना वेळे लागत आहे. हे लक्षात आल्यानंतर सत्ताधारी व विरोधी गटाचे उमेदवार बाळासाहेबांच्या हॉटलेमध्ये एकत्रित चहा व नाश्त्यासाठी एकत्र आले होते. मांगी गटातील शिंदे यांच्यासह बाळासाहेब पांढरे, भांडवलकर, यादव, हाके आदी उपस्थित होते. बागल गटाचे समर्थक चंद्रशेखर जोगळेकर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र घोडगे, प्रकाश गिरंजे हेही यावेळी उपस्थित होते.
रावगामधील कार्यकर्ते…
संदीप शेळके, आजिनाथ रासकर, शहाजी करगळ, दत्तु बरडे, शशिकांत केकान, मधुकर गोरे, भाऊसाहेब करगळ, राजेंद्र पाटील, राजेंद्र मोडके, हुसेन शेख, धिरज करगळ, संतोष करगळ, राम बाबर, संजय मोडके, इस्माईल शेख, कांतिलाल शिंदे, बाबा जाधव, सदाशिव वणवे, भरत धगाटे, सुरज बरडे, काका बरडे, बापु वरपे व जगु बरडे हे बागल गटाचे कार्यकर्ते सकाळपासून परिसरात उपस्थित होते.
झोळ यांनी केले विजयी उमेदवारांचे अभिनंदन
निवडणुकीचा निकाल जाहीर होताच बागल विरोधी गटाचे प्रमुख प्रा. झोळ यांनी निवडणुकीत विजयी झालेले सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले असून आमची लढाई शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आहे. ही लढाई सुरूच राहणार असून नूतन संचालकांनी कारखाना व्यव्यस्थित चालवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी त्यांना शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया बारा बांगला येथील संपर्क कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी दिली आहे.