करमाळा (अशोक मुरूमकर) : तुझी लायकी नाही माझ्याबरोबर राहण्याची व बाहेर गावी फिरायला घेऊन जाण्याची, असे म्हणून सतत हिणवणे व विवाहबाह्य प्रेमसंबंधांची माहिती झाल्यानंतर तुला फक्त मोलकरीण म्हणून आणले आहे असे म्हणत जीव मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी १९ वर्षाच्या विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सातजणांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासू, सासरे, दीर व नणंद यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, ‘विवाह झाल्यानंतर सुरुवातीला व्यवस्थित नंदवले. मात्र पुढे आठच दिवसात शारीरिक व मानसिक छळ सुरु केला. चुलत सासू व सासरे यांनीही घरी येऊन वेगवेगळ्या कारणांनी त्रास देणे सुरु केले. त्यावरून पती मारहाण करू लागला. अत्याचा मुलगा माहेरवरून पोल्ट्री टाकण्यासाठी पैसे आणायला सांगत होता. त्यानुसार वडिलांनी पतीला दोन लाख रुपये दिलेही. नंतर डंपिंग ट्रेलर घेण्यासाठी पुन्हा एक लाख घेऊन येण्यास सांगितले. दरम्यान पतीची मानलेली बहीण व तिचा पती हेदेखील घरी येऊन कानभरणी करत होते. त्यानंतर गुन्हा दाखल झालेल्या संशयितांनी मारहाण करणे, उपाशी ठेवणे असा त्रास देणे सुरु केले.’
या फिर्यादीत विवाहितेने पुढे म्हटले आहे की, ‘पतीचे बारामतीत एका महिलेशी विवाहबाह्य प्रेमसबंध होते. त्यामुळे त्यांनी कधी पत्नीचा दर्जा दिला नाही. तुझी लायकी नाही माझ्याबरोबर राहण्याची व बाहेर गावी फिरायला घेऊन जाण्याची, असे म्हणून सतत हिणवणे व विवाहबाह्य प्रेमसंबंधांची माहिती झाल्यानंतर तुला फक्त मोलकरीण म्हणून आणले आहे, असे म्हणत जीव मारण्याची धमकी देत होते. पाठीत व पोटात मारहाण करून घरातून त्यांनी हाकलून दिले. माहेरवरून येताना तीन लाख घेऊन ये अन्यथा जीव मारून टाकीन अशी धमकी दिल्याचे’ म्हटले आहे.
