करमाळा (सोलापूर) : आषाढी वारीनिमित्त पंढरीला येणाऱ्या पालख्यांपैकी एक असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे उद्या (बुधवारी) सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक्येश्वर येथून मुक्काम दर मुक्काम करत पालखी रावगाव येथे मुक्कामासाठी येत आहे. सोलापूर आणि नगर जिल्ह्याच्या हद्दीवर शेगूड येथे प्रशासनाच्या वतीने दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर रावगाव येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव व गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी या भागाची पहाणी केली आहे. वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी सुमित जाधव यांनीही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पथक केले आहे.
औरंगाबाद, नगर, धुळे, जळगाव आदी भागातून पंढरपूरला दिंड्यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातून वारकरी जातात. त्यापैकी श्री. संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सर्वात मोठी असते. करमाळा तालुक्यात रावगाव, जेऊर व कंदर येथे या पालखीचा मुक्काम असतो. या स्वागतासाठी जिल्ह्याच्या हद्दीवर स्वागत कमान टाकण्यात आली आहे. त्यानंतर रावगाव येथेही प्रशासन आणि गावकऱ्यांनी संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. सध्या येथे पाणी टंचाई आहे त्यामुळे टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्य संतोष वारे यांनी एक टँकर दिला आहे. तर दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्या माध्यमातून एक टँकर दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
वारकऱ्यांसाठी मंडप, महिलांसाठी स्नानगृह
पालखी सोहळ्यात आलेल्या महिला वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने यावेळी नियोजन केले आहे. पालखीस्थळावर महिलांसाठी तत्पुरते स्नानगृह उभारण्यात आले आहे. वरकऱ्यांसाठी मुक्कामाच्या ठिकाणी मंडप टाकण्यात आला आहे.
पालकमंत्री विखे पाटील यांचे स्वीसहायक माने यांच्याकडून पहाणी
सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या श्री संत निवृतीनाथ महाराज पालखी मार्गाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीसहायक यशवंत माने यांनी नुकतीच पालखी मार्गाची पहाणी केली आहे. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचे नियोजन करण्याबाबत त्यांनी सूचना केली असल्याचे सांगितले आहे. पालकमंत्री विखे पाटील हे परवा शुक्रवारी करमाळ्यात पालखी सोहळ्याला भेट देतील, अशी शक्यता आहे.
महावीतरणकडून 21 कर्मचाऱ्यांचे पथक
पालखी सोहळ्यात वीजपुरवठा सुरळीत रहावा म्हणून जाधव यांनी 21 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आहे. रावगाव येथे पालखी स्थळावर चार अधिकारी व कर्मचारी कायमस्वरूपी उपस्थित असतील. याशिवाय रावगाव गावठाण डीपी, डुकरेवडी, रावगाव नियंत्रण कक्ष, संगोबा एबी, गुळसडी, वीट एजी, करमाळा उपकेंद्र आशा ठिकाणी अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहेत. येथे वीज खंडित होऊ नये म्हणून सर्व ठिकाणची येथे वीज येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.