करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ. अमित कदम यांचा साताऱ्यात वैद्यकीय व्यवसाय आहे. त्यामुळे ते कार्यालयात सतत अनुपस्थित राहत आहेत’, असा आरोप शिवसेनेचे (शिंदे गट) माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केला आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. कुलदीप जंगम यांच्याकडे त्यांनी निवेदनही दिले आहे. दरम्यान पंचात समितीचे गटविकास अधिकारी डॉ. कदम यांनी हा आरोप फेटाळला असून ‘माझा कोणताही वैद्यकीय व्यवसाय नाही. वडिलांची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे वरिष्ठांची परवानगी घेऊनच मी रजेवर गेलो होतो’, असे ते म्हणाले आहेत.
माजी आमदार जगताप म्हणाले, ‘गट विकास अधिकारी डॉ. कदम हे कार्यालयात अनुपस्थित असतात. त्यांनी पदभार घेतल्यापासून पंचायत समितीचा कारभार विस्कळीत झाला आहे. नागरिकांची कामे रखडली आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांसाठी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न निर्माण होत आहे.’
पुढे त्यांनी म्हटले आहे की, ‘डॉ. कदम हे सातारा येथे वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे ते सतत अनुपस्थित राहत असल्याची माहिती मिळाली आहे. करमाळा येथे झालेल्या आमसभेत देखील याविषयी प्रश्न उपस्थित झाले होते. तरीदेखील त्याचा काही परिणाम झाला नाही. डॉ. कदम यांच्या सातत्याने अनुपस्थितीची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
डॉ. कदम म्हणाले, ‘माझा कोणताही वैद्यकीय व्यवसाय नाही. वडिलांची तब्येत ठीक नव्हती. म्हणून मी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीनेच रजेवर होतो. ऐकीव माहितीच्या आधारे माझ्यावर आरोप केला जात आहे.’