शिरसोडी ते कुगाव पुलाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते भूमीपूजन

करमाळा (सोलापूर) : उजनी धरणाच्या जलाशयावर शिरसोडी (इंदापूर) ते कुगाव (करमाळा) या उच्च पातळीच्या लांब पुलाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. या कामासाठी ३८२ कोटी २२ लाख निधी मंजूर झाला आहे. आमदार दत्तात्रय भरणे, आमदार संजयमामा शिंदे यावेळी उपस्थित होते.

उजनी धरणाच्या निर्मितीनंतर ४० वर्षांनीं हा काम होत आहे. या पुलामुळे इंदापूर व करमाळा हे तालुका जवळ येणार आहेत. त्याचा फायदा दळणवळणासाठी होणार असून राज्याचे दोन विभाग जवळच्या मार्गाने जोडले जाणार आहेत. बॅकवॉटर भागातील केळी, ऊस या शेतीमालाची वाहतूक तसेच पर्यटन विकास यासाठी या पुलाचा फायदा होणार आहे.

कुगाव ते कळाशी दरम्यान जलवाहतूक करणारी बोट बुडून पाच व्यक्तींचा मृत्यू मध्यंतरी झाला होता. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी आमदार शिंदे यांनी अधिवेशनात पुल बांधकामाची मागणी केली होती. या कामाचे भूमिपूजन होत असल्यामुळे करमाळा तालुक्यासाठी तसेच इंदापूर तालुक्यासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

शिरसोडी ते कुगाव पुलाच्या भूमीपूजनप्रसंगी आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष धंनजय डोंगरे, सचिन गावडे, धुळगाव कोकरे, महादेव कामटे, शाबुद्दीन सय्यद, विजय कोकरे, महादेव पोरे, कैलास बोंद्रे, प्रकाश डोंगरे, मंगेश बोंद्रे, शंकर बोंद्रे, अर्जुन अवघडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *