करमाळा (अशोक मुरूमकर) : पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (अजित पवार गट) व भाजपने गटनेत्यांची निवड केली आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दशरथ घाडगे यांची राष्ट्रवादीच्या तर भाजपच्या सोनाली तकिक यांची गटनेते म्हणून नियुक्ती झाली असल्याची माहिती आहे.
पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड गुरुवारी (ता. १२) होणार आहे. त्याची तयारी सुरु आहे. गटनोंदणीमुळे सदस्यांना कायदेशीर व्हीप लागू होतो. करमाळ्यात पंचायत समितीचे १२ सदस्य आहेत. यामध्ये माजी आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे हिसरे गणातून भारत अवताडे, साडे गणातून दशरथ घाडगे, चिखलठाण गणातून वनमाला सरडे व केत्तूर गणातून ऍड. अजित विघ्ने हे चार सदस्य आहेत. बागल यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे वीट गणातून पूजा ढेरे, रावगाव गणातून संध्या कांबळे, कोर्टी गणातून नानासाहेब झाकणे व वांगी गणातून सोनाली तकिक हे चार सदस्य आहेत. आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुका विकास आघाडीचे पांडे गणातून स्वप्नील काळे, उमरड गणातून अदिती पाटील, जेऊर गणातून लत्ता शिरस्कर व केम गणातून ज्ञानेश्वर बिचितकर हे चार सदस्य आहेत.
करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा व पंचायत समितीच्या १२ जागा आहेत. माजी आमदार शिंदे व बागल हे या निवडणुकीत एकत्रित भाजप व राष्ट्रवादीच्या माध्यमातून लढले. तर आमदार पाटील हे स्वतंत्रपणे लढले होते. तिघांच्या समान जागा असल्याने सभापती नेमका कोणाचा होणार याबाबत उलटसुलट चर्चा आहेत. मात्र भाजपच्या पूजा ढेरे यांचे नाव सभापतीपदावर आघाडीवर असल्याची चर्चा आहे. तर उपसभापती म्हणून अवताडे यांचे नाव चर्चेत आहे. निवडणुकीत कोणताही दगा फटका होऊ नये म्हणून शिंदे व बागल यांनी काळजी घेतली असल्याचे बोलले जात आहे.
