सोलापूर : माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धी व प्रभावी अंमलबजावणी करिता सरकार स्तरावरून सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. माहिती अधिकार अधिनियमातील तरतूदींचा प्रभावीपणे व सकारात्मक वापर करुन अर्जदाराला वेळेत आवश्यक ती माहिती उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी कुमार आर्शीवाद यांनी केल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, ईशादीन शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरळे, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे आदी उपस्थित होते. शासकीय माहिती अधिकाऱ्यांनी आपल्याकडे आलेल्या अर्जदारांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करावे. तसेच एखाद्या विषया संबंधी माहिती मागितली असेल तर त्यांना योग्य व अचूक माहिती उपलब्ध करून द्यावी. माहिती अधिकाराच्या अधिनियमाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यामध्ये शासकीय माहिती अधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी केल्या.
यावेळी माहिती अधिकार अधिनियमातील तरतूदी व त्यावरील विविध शासन निर्णय याबाबत तहसीलदार गीता गायकवाड व नायब तहसीलदार रामकृष्ण पुदाले यांनी मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमात महसूल व जिल्हापरिषद सोलापूर येथील अधिकारी व कर्मचारी यांना माहिती अधिकार अधिनियम 2005 चे विस्तृत विवेचन व उजळणी प्रशिक्षण देवून माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला.