करमाळा (सोलापूर) : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज (रविवारी) सकाळी ११ वाजता कमलादेवी रोड बायपास चौक येथे रस्ता रोको आंदोलन झाले. यावेळी टेंभुर्णी- नगर महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. आंदोलनकर्त्यांचे प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव व पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी निवेदन स्विकारले. करमाळ्यात झालेल्या रस्ता रोकोवेळी अनेक संघटनांनी पाठींबा दिला. यावेळी शेकडो समाज बांधव उपस्थित होते.
सकल मराठा समाज करमाळा यांच्या वतीने हा रास्ता रोको करण्यात आला. जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकावर लाठी हल्ला झाल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काही समाज बांधवानी व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून आंदोलनाला पाठींबा दिला. बुधवारी (ता. ६) पोथरे नाका येथून तहसील कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. या मोर्चावेळी अग्रवाल परिवाराने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.
श्री छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा बांधवाबरोबरच बहुजन बांधवांचे आराध्य दैवत आहे. त्यांचे वारस म्हणून मराठा समाजाने आतापर्यंत मोठ्या भावाच्या भूमिकेतून सर्व जाती धर्माना न्याय देण्याचे काम केले. मराठा समाज सध्या बिकट परिस्थितीत आहे. या समाजातील पाच- दहा टक्के गडगंज श्रीमंत असल्याने त्यांना आरक्षणाची गरज नाही. मराठा समाजातील पुढार्यांना केवळ राजकारणापुरती मराठा समाजाची मते मातापुरते समाजाचे राजकारण करण्याचे काम केले आहे. आरक्षणाचे गाजर दाखवून मराठा समाजाला दारिद्र्याच्या खाईत लोटण्याचे काम राजकीय मंडळींनी केले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. आता आरक्षणाशिवाय पर्याय नाही, आजपर्यंत शांततेच्या मार्गाने 58 मोर्चे काढले. या मराठा क्रांती मोर्चाचे सर्वत्र कौतुक झाले आहे. अशा परिस्थितीत जालना जिल्ह्यात मराठा समाज बांधव आरक्षणासाठी शांततेने आंदोलन करत असताना ते आंदोलन दडपण्यासाठी लाठीचार्ज करून अन्याय केला आहे, असे यावेळी सांगण्यात आले.