करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यात अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाच्या आज (शनिवारी) काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. मात्र या पावसाने एका व्यक्तीचा व दोन बोकडे आणि 17 कोंबड्याचा बळी घेतला आहे. दुपारी 4 वाजताच्या दरम्यान करमाळा तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. यामध्ये मोरवड येथे वीज कोसळून एकाचा तर पोफळज येथे एक बोकड ठार झाले. हिवरवाडीत घरासमोरील झाड कोसळून एक बोकड व १७ कोंबड्या ठार झाल्या आहेत. याबाबत प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी तत्काळ घटनास्थळाची माहिती घेऊन पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मोरवड येथे वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. अंबुदास बाजीराव काळे (वय ६०) असे त्यांचे नाव आहे. आज (शनिवारी) दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. काळे हे शेतात जनावरे चारण्यासाठी गेले होते. मात्र दुपारी पाऊस सुरू झाला. दरम्यान अंगावर वीज कोसळल्याने काळे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले, दोन नातवंडे व पत्नी असा परिवार आहे. या घटनेनंतर काळे यांच्या मृतदेहाचे करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
हिवरवाडीत दत्तात्रय मारुती पवार यांच्या घरासमोरील झाड कोसळल्याने एक बोकड आणि १७ कोंबड्या ठार झाल्या आहेत. सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तर पोफळज येथे वीज कोसळून हनुमंत महादेव गव्हाणे यांचे बोकड ठार झाले आहे. करमाळा शहरासह, वीट, मोरवड, पोथरे, रोशेवाडी आदी ठिकाणी आज पाऊस झाला आहे. कमी अधिक प्रमाणात हा पाऊस झाला असून आणखी पावसाची आवश्यकता आहे.