करमाळा (सोलापूर) : येथील उपजिल्हा रुग्णालय येथे कर्करोग जनजागृती मोहीम शिबिर झाले. याचे उदघाटन आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ. अमोल घाडगे, उपजिल्हा रुग्णालयाचे रुग्ण कल्याण समितीचे सदस्य फारूक जमादार, सोलापूर जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन गुंजकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. काटकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे, स्त्री रोग तज्ञ डॉ. स्मिता बंडगर आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, ‘बदलती जीवनशैली व खानपान यामुळे कर्करोग रुग्ण वाढत आहेत. कर्करोगाला घाबरून न जाता त्याचे लवकरात लवकर निदान करून उपचार करणे गरजेचे आहे. रुग्णालयात रुग्णांना सोयी सुविधा देण्याबाबत सरकारकडे पाठपुरावा करु’, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
कर्करोग शिबिरात २५६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यासाठी अत्याधुनिक सर्व सोयी सुसज्ज कॅन्सर व्हॅन उपजिल्हा रुग्णालय येथे उपलब्ध करण्यात आली होती. दंतरोग चिकित्सक डॉ. गोरक्षनाथ शिंदे यांनी ओरल कॅन्सर संदर्भात तपासणी व मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी उपजिल्हा रुग्णालयमधील अधिकारी, कर्मचारी, आरोग्यसेविका, सेवक, आशा गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.