करमाळा (अशोक मुरूमकर) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा उद्या (मंगळवार) पहिला पेपर आहे. यावर्षी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व महात्मा गांधी विद्यालय या दोनच ठिकाणी विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी नियंत्रण ठेवले जाणार आहे, अशी माहिती केंद्र संचालक उपप्राचार्य संभाजी किर्दाक यांनी ‘काय सांगता’शी बोलताना दिली आहे. दरवर्षी करमाळ्यातील कन्या विद्यालय व अण्णासाहेब जगताप विद्यालय येथेही इंग्रजीच्या पेपरला बैठक व्यवस्था केली जात होती.
११ फेब्रुवारी ते ८ मार्च पर्यंत १२ वी ची परीक्षा असणार आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे ३२ ब्लॉकमध्ये ८०० व महात्मा गांधी विद्यालय येथे १३ ब्लॉकमध्ये ३२० असे ११२० विद्यार्थी इंग्रजी विषयाचा पेपर देणार आहेत. केंद्र संचालक उपप्राचार्य किर्दाक म्हणाले, ‘कला, वाणिज्य व विज्ञान शाखांची सर्व विषयांची बैठक व्यवस्था बदलती असणार आहे. बैठक व्यवस्था मुख्य केंद्र यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आहे. इंग्रजी पेपरसाठी अतिरिक्त बैठक व्यवस्था महात्मा गांधी विद्यालय येथे करण्यात आलेली आहे. परीक्षार्थीनी परीक्षा केंद्रावर मोबाईल, स्मार्ट वॊच, कॅल्क्युलेटर आदी साहित्य नेह्ण्यास बंदी आहे. परीक्षागृहात कॉपी करताना कोण आढळले तर आहे. परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू असणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या आधी १५ मिनिटे परीक्षागृहात येणे आवश्यक आहे. कॉपीमुक्त परीक्षा व्हावी व सर्व ब्लॉकमध्ये नियंत्रण रहावे कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी न घाबरता परीक्षा द्यावी, आंनदी वातावरण रहावे म्हणून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार असल्याचेही केंद्र संचालक उपप्राचार्य किर्दाक यांनी सांगितले आहे.