नवी दिल्ली : तूरडाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच आयात केलेली तूरडाळ भारतीय धान्य बाजारात उपलब्ध होईपर्यंत, राष्ट्रीय राखीव साठ्यातून टप्पा- टप्याने आणि लक्षीत तूरडाळसाठा बाजारात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज घेतला आहे. त्यादृष्टीने, डाळ उत्पादित करणाऱ्या पात्र मिलधारकांकडून ऑनलाईन लिलावाद्वारे डाळ घेण्याचे निर्देश ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ग्राहक व्यवहार विभागाने नाफेड (राष्ट्रीय कृषी सहकार विपणन महासंघ) आणि एनसीसीएफ म्हणजे राष्ट्रीय सहकार ग्राहक महासंघाला दिले आहेत. याद्वारे सर्व राज्यांच्या ग्राहकांना तूरडाळ उपलब्ध होणार आहे.

ग्राहकांना रास्त दरात तूरडाळ उपलब्ध होण्याच्या निकषांवर वितरणाचे मूल्यमापन करुन, त्या आधारे लिलावासाठी तूरडाळीचे प्रमाण आणि नियमितता निश्चित केली जाईल. सरकारने 2 जूनला अत्यावश्यक वस्तू कायदा, 1955 लागू करून तूर आणि उडीद डाळीवर साठा मर्यादा लागू केली होती. त्यामुळे अवैध साठेबाजी रोखता येईल आणि ग्राहकांना परवडणाऱ्या दरात डाळी उपलब्ध होऊ शकतील. या आदेशानुसार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत तूर आणि उडीद डाळीसाठी साठा मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

घाऊक विक्रेत्यांसाठी प्रत्येक डाळीबाबत वैयक्तिकरित्या लागू असलेली साठवणूक मर्यादा 200 टन आहे. किरकोळ विक्रेत्यांसाठी 5 टन, मोठ्या साखळी विक्रेत्यांसाठी प्रत्येक किरकोळ दुकानांमधे 5 टन आणि गोदामामधे ती 200 टन आहे. डाळीच्या गिरणी मालकांसाठी उत्पादनाचे शेवटचे 3 महिने किंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या 25 टक्के, यापैकी जास्त असेल ती मर्यादा असेल. या आदेशाद्वारे विभागाच्या पोर्टलवर (https://fcainfoweb.nic.in/psp) साठ्याची स्थिती घोषित करणे संबंधितांना बंधनकारक केले आहे.

या आदेशान्वये साठा मर्यादेची अंमलबजावणी आणि पोर्टलवरील साठ्याची जाहीर केलेली माहिती यावर ग्राहक व्यवहार विभाग आणि राज्य सरकार सतत लक्ष ठेवतात. या संदर्भात, केन्द्रीय गोदाम महामंडळ (CWC) आणि राज्य गोदाम महामंडळ (SWCs) यांच्या गोदामांमध्ये विविध संस्थांनी ठेवलेला साठा आणि बाजारातील व्यापाऱ्यांनी बँकांकडे तारण ठेवलेला साठा यांची पुन्हा पडताळणी पोर्टलवर घोषित केलेल्या प्रमाणांच्या तुलनेत केली आहे. राज्य सरकारे आपापल्या राज्यातील किमतींवर सतत लक्ष ठेवत असून आवश्यक साठा उपलब्ध आहे किंवा नाही याची पडताळणी करत असून, साठा मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल, असेही नमूद केले आहे.