सध्या राज्यामध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. असे भासवले जाते परंतू राज्यातील नागरिकांना राष्ट्रीय महाविकास आघाडीचा तिसरा पर्याय खुला असल्याचे प्रतिपादन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय महाविकास आघाडीचे मुख्य संयोजक हेमंत पाटील यांनी केले.
महाराष्ट्राचा राजकारणात प्रमुख पक्षाचे नेते एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका करण्यात व्यस्त आहे. परंतु महाराष्ट्राच्या विकासाकडे कोणाचेही लक्ष नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव भेटत नाही. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या महाराष्ट्रातल्या ५२ टक्के पेक्षा जास्त असणाऱ्या ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व भेटत नाही. समाजातील अनेक छोट्या मोठ्या घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रीय महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील असल्याचे हेमंत पाटील म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आम्ही राज्यातील सर्व छोट्या मोठ्या पक्षांच्या प्रमुखांना या आघाडीमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजी राजे यांनी या तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करावे. इतरही छोट्या मोठ्या संघटना राष्ट्रीय महाविकास आघाडीत सामील होणार असल्याचे हेमंत पाटील म्हणाले.