Video : बिनविरोधची शक्यता धूसर! आदिनाथसाठी 272 उमेदवार रिंगणात

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील बंद असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (सोमवारी) शेवटच्या दिवशी आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, बागल गटाकडून माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, माजी उपसभापती चिंतामणी जगताप, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, प्रा. रामदास झोळ, दशरथ कांबळे, सुहास गलांडे व रमेश कांबळे यांच्यासह 272 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

आदिनाथ कारखान्यासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. या अर्जांची मंगळवारी छाननी होणार असून बुधवारपासून २ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. दाखल अर्ज जास्त झाले असले तरी यातील पात्र किती होतील यावर पुढील चित्र समजणार आहे. आदिनाथ कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन माजी आमदार जगताप यांनी केले होते. मात्र तरीही २१ जागांसाठी २७३ अर्ज दाखल झाले आहेत.

अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच शिंदे, पाटील, बागल, जगताप गटाचे कार्यकर्ते तहसील परिसरात उपस्थित होते. प्रा. झोळ हे शेवटपर्यंत होते. जगताप, शिंदे व पाटील यांनी सूचकांमार्फत अर्ज दाखल केले. सुजित बागल, चंद्रकांत सरडे, शेखर गाडे, डॉ. अमोल घाडगे, अतुल पाटील, संतोष वारे, राजेंद्र बारकुंड, अण्णा पवार, डॉ. दीपक केवारे, संतोष पाटील, अजिंक्य पाटील, अभिजित पाटील, संदीप तळेकर, डॉ. गोरख गुळवे, हरिश्चंद्र झिंजाडे, राजेंद्र दांडे, प्रतापराव जगताप, गणेश चिवटे, देवनांद बागल, सुनील सावंत, अॅड. राहुल सावंत, कन्हैयालाल देवी, प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोलसिंह भोसले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिल्पा ठोकडे हे काम पाहत आहेत. पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पोपट टिळेकर यांनी बंदोबस्त ठेवला होता. बरोबर ३ वाजता वेळ संपली असल्याची घोषणा संतोष गोसावी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *