Charity health servants should inform the patient relatives about the documents required

सोलापूर : जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या रुग्णालयात रुग्ण आल्यानंतर सर्वप्रथम रुग्णालयांनी त्या रुग्णांना रुग्णालयात तात्काळ दाखल करून घ्यावे व वैद्यकीय उपचार सुरू करावेत. त्यानंतर धर्मादाय आरोग्य सेवक रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांच्याकडून आवश्यक दस्तावेज घेऊन रुग्णालयाला सादर करतील, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्देशित केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित धर्मादाय रुग्णालयात खाटा आरक्षण ठेवण्याबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक प्रताप खोसे, अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज कुंभारीचे विश्वस्त मेहुल बिपिनभाई पटेल, कर्मवीर औदुंबररावजी पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे युवराज पाटील, श्रीमती मल्लवाबाई वल्याळ डेंटल हॉस्पिटलचे नागेश वल्याळ, अलफेज हॉस्पिटलचे मे. हुसेन, शेठ सखाराम नेमचंद रुग्णालयाचे अरविंद राठी, यशोधरा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉ. विश्वनाथ अक्कलवडे यांच्यासह अन्य धर्मादाय रुग्णालयाचे विश्वस्त, अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले, कोणत्याही रुग्णालयाने प्रथम रुग्णांना उपचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती धर्मादाय आरोग्य सेवक यांच्याकडून घ्यावी. प्रत्येक रुग्णालयातील धर्मादाय आरोग्य सेवकांनी संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा करून तो रुग्ण निर्धन अथवा दुर्बल घटकातील आहे का त्याची माहिती करून संबंधित रुग्णांच्या नातेवाईकाकडून त्यानुसार आवश्यक असलेले दस्तावेज मागवून घ्यावेत व ते रुग्णालयाकडे सादर करावेत. कोणत्याही परिस्थितीत धर्मादाय रुग्णालयात आलेला रुग्ण उपचाराशिवाय परत जाणार नाही याची जबाबदारी संबंधित रुग्णालय व धर्मदाय आरोग्य सेवकाची राहील असेही त्यांनी सूचित केले.

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 अन्वये प्रत्येक धर्मादाय रुग्णालयात निर्धन रुग्णासाठी दहा टक्के खाटा राखीव असून, वैद्यकीय उपचार पूर्णपणे मोफत आहेत, तर दुर्बल घटकातील रुग्णांसाठी ही दहा टक्के खाटा राखीव असून त्यांना सवलतीच्या दरात वैद्यकीय उपचार केले जावेत असे नमूद करण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे सर्व संबंधित धर्मादाय रुग्णालय व त्यांचे विश्वस्त यांनी याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी व आपल्या रुग्णालयात उपरोक्त कलमानुसार खाटा आरक्षित ठेवाव्यात व त्याबाबतची माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. प्रारंभी धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक प्रताप खोसे यांनी जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयाची संख्या 17 असून या अंतर्गत माहे डिसेंबर 2023 अखेर पर्यंत 16 हजार 642 रुग्णांनी वैद्यकीय उपचार घेतले आहेत. यामध्ये निर्धन घटकातील 484 रुग्ण तर दुर्बल घटकातील सात रुग्ण यांचा समावेश आहे.

धर्मादाय रुग्णालयाचे अध्यक्ष विश्वस्त प्रतिनिधी यांनीही त्यांच्या रुग्णालयामार्फत आरक्षित खाटाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांकडून कागदपत्राच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणीची ही माहिती दिली. कलम 41 अ प्रमाणे रुग्णालयाकडून कार्यवाही होईल असे सांगितले.

यासाठी आवश्यक कागदपत्रे (खालीलपैकी कोणतेही एक):-

  1. वार्षिक उत्पन्नाचे तहसीलदार यांचे उत्पन्न प्रमाणपत्र 2. शिधापत्रिका 3. दारिद्र्यरेषेखालील पत्रिका.

*उत्पन्न मर्यादा-
निर्धन रुग्णासाठी 1 लाख 80 हजार तर दुर्बल घटकातील रुग्णांसाठी 3 लाख 60 हजार वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे.

सोलापूर जिल्ह्यात धर्मादाय रुग्णालयांची संख्या 17 असून त्यांची नावे, एकूण खाटांची संख्या निर्धन रुग्ण व दुर्बल घटकातील रुग्ण राखीव खाटा पुढीलप्रमाणे.
एन.एम. पटेल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज कुंभारी, कर्मवीर औदुंबर रावजी पाटील चॅरिटेबल ट्रस्ट पंढरपूर, श्रीमती मल्लवाबाई वल्ल्याळ चॅरिटेबल डेंटल हॉस्पिटल रिसर्च सेंटर केगाव सोलापूर, अलफैज हॉस्पिटल सोलापूर, शेठ नेमचंद जैन औषधालय व रुग्णालय ट्रस्ट सोलापूर, यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर, श्री सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सोलापूर, जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी, श्रीमती मल्लवाबाई वल्याळ हॉस्पिटल सोलापूर, युगंधरा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर, नर्सिंग दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी, धनराज गिरजी रुग्णालय विश्वस्त सोलापूर, लायन्स ब्रिजमोहन फोफलीया नेत्रालय सोलापूर, इंडियन कॅन्सर सोसायटी सोलापूर, गांधीनाथा रंगजी हॉस्पिटल सोलापूर व जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूर.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *