करमाळा (सोलापूर) : सरकारच्या ‘लखपती दीदी’ योजनेअंतर्गत महाराष्ट्र बँकेने ११ महिला बचत गटांना (स्वयं सहाय्यता समूह) ३३ लाखांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या करमाळा येथील वेताळ पेठ शाखेत बँक व्यवस्थापक मोहन कुमार यांच्या हस्ते आज (शनिवार) धनादेश वितरण करण्यात आले.
पोथरे येथील मधुबन महिला स्वयं सहाय्यता समूह, जिजाऊ महिला स्वयं सहाय्यता समूह, जयमाता महिला स्वयं सहाय्यता समूह, राजमाता महिला स्वयं सहाय्यता समूह, स्वाभिमानी महिला स्वयं सहाय्यता समूह, शेतकरी महिला स्वयं सहाय्यता समूह, रुक्मिणी महिला स्वयं सहाय्यता समूह, श्रीगुरुदेव महिला स्वयं सहाय्यता समूह, जोगेश्वरी महिला स्वयं सहाय्यता समूह, वैष्णवी महिला स्वयं सहाय्यता समूह व जिजामाता महिला स्वयं सहाय्यता समूह यांना प्रत्येकी तीन लाख रुपयेचा धनादेश देण्यात आला.
उमेद अंतर्गत बँकेकडून महिला बचत गटांना अर्थसहाय्य केले जाते. कुटुंबाचा आर्थिक विकास व्हावा हा यामागचा उद्देश आहे. महिलांनी लघु उद्योग करावेत व त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून बँक अर्थसहाय्य करत आहे. गेल्यावेळी बँकेने ६८ लाख कर्ज वितरण केले होते. त्याची चांगल्याप्रकारे परतफेड झाली आहे. बँकेने दिलेले कर्ज वेळेत परत केले तर बँक पुन्हा त्यांना कर्ज देऊन प्रोत्साहन देते. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून व्यवसाय करत कुटुंबाची प्रगती करावी व बँकेचे कर्ज परत करावे, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी बँक व्यवस्थापक मोहन कुमार, ऑफिसर अविनाश पेंटे, प्रवीण जाधव, बँक मित्र बाळकृष्ण कुलकर्णी, आयसीआरपी नूतन शिंदे, उषा आढाव, प्रियंका शिंदे, माया शिंदे, बँक सखी अश्विनी घोडके, कृषी व्यवस्थापक महावीर नरसाळे व बलभीम बागल यांच्यासह पोथरे येथील महिला उपस्थित होत्या. बँक ऑफ महाराष्ट्रकडे करमाळा शहरासह पोथरे, बिटरगाव श्री, आळजापूर व देवळाली ही गावे आहेत.