करमाळा : राजकीय जोडे बाजूला ठेऊन मांगी पाणीप्रश्न सोडवण्याच्या लढ्यात नागरिकांनी सामील व्हावे, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले आहे. मांगी तलाव कुकडी लाभक्षेत्रात विलीन करण्यासाठी करमाळा भाजप संपर्क कार्यालयात आज (बुधवारी) बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
मांगी तलावावर 22 गावातील शेती अवलंबून आहे. याबरोबर 13 गावची पाणी पुरवठा योजना अवलंबून आहे. मांगी तलावात फक्त कर्जत तालुक्यातील पाणी येते. कर्जत तालुक्यातील नद्या, ओढ्यावर अनेक बंधारे, मातीनाले झाल्याने मांगी तलावात पावसाचे पाणी येत नाही. परिणामी वर्षानुवर्षे तलाव कोरडा राहतो. यामुळे याचा प्रतिकुल परिणाम तलावावर अवलंबून असणाऱ्या शेती व पाणी पुरवठा योजनावर होतो. यामुळे मांगी तलाव कुकडी लाभलाक्षेत्रात समाविष्ट होणे गरजेचे आहे.
राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे. माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हा प्रश्न सोडवून घेणार आहोत. याबद्दल खासदारांनी सकारात्मक अनुकूलता दर्शवली आहे. मांगी लाभक्षेत्रातील गावामध्ये मी स्वतः गेल्या सात- आठ दिवसापासून बैठका घेत आहे. या लढ्यात लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत त्यामुळे मांगी लाभक्षेत्रातील इतर लोकांनीही राजकीय जोडे बाजूला ठेऊन या पाणीप्रश्नाच्या लढ्यात सामील व्हावे, असे चिवटे यांनी सांगितले.