करमाळा (सोलापूर) : स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, रस्ते आदी कुठल्याही सुविधा पुरविल्या जात नाहीत, असा आरोप करून करमाळा नगरपालिकेकडून आकारले जात असलेले हे कर नागरिकांनी भरू नयेत, असे आवाहन मकाईचे माजी संचालक विवेक येवले यांनी केले आहे.
येवले म्हणाले, सार्वजनिक स्वछता व आरोग्य याबाब करमाळा नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही. जागोजागी साठलेला कचरा, प्लॅस्टिक कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या गटारी, गटारीतील गाळ कधीतरी काढून रस्त्यावरच टाकण्याची पध्दत, भटकी कुत्री, डुकरे, मोकाट जनावरे याचा वावर यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यांमुळे नागरिकांना जगणे अवघड झाले आहे, नागरिकांनी तक्रारी करूनही लक्ष दिले जात नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील मेनरोड, एसटी स्टँड परिसर, राशीन पेठ, गुजर गल्ली, भवानी व मंगळवार पेठ परिसरात स्थानिक व्यापाऱ्यांनी रस्त्यांवर केलेली अतिक्रमणे, त्या- त्या भागात रहाणाऱ्या रहिवाशांनी रस्त्यावर कायमस्वरूपी उभी केलेली चारचाकी, दुचाकी वाहने, शहर परिसरात रोज नवीन होत असलेली अतिक्रमणे यामुळे शहरातील वाहतुकीचा व पादचाऱ्यांच्या रस्त्याने चालण्याचा प्रश्न जटिल बनला आहे. दोन वर्षांपासून पालिकेवर प्रशासक आहे, मात्र प्रशासक असलेले माढा उपविभागीय अधिकारी, पालिकेचे मुख्याधिकारी हे शहरातील समस्यांची पाहणी करण्यासाठी चुकूनसुद्धा शहरात फिरकत नाहीत, असाही आरोप त्यांनी केला आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे आता थांबवणं गरजेचे आहे. त्यामुळं निष्क्रिय अधिकारी यांना वठणीवर आणण्यासाठी कर न भरण्याचे असहकार आंदोलन नागरिकांनी सुरू करावे, असे आवाहन करून यासंदर्भात नागरिकांच्या वतीने लवकरच न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही येवले यांनी सांगितले आहे.