करमाळा (अशोक मुरूमकर) : ग्राहक पंचायतीमुळे घराघरात पोहोचलेल्या भालचंद्र पाठक अर्थात पाठक सरांचे काल निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने करमाळा तालुक्यातील ग्राहक पंचायत पोरकी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ग्राहक पंचायतीचे काम करतानाच त्यांच्या आयुष्याचा शेवट झाला. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मदत केली, त्यातून अनेकजण त्यांच्या संपर्कात आले.
‘काय सांगता’ न्यूज पोर्टलच्या कार्यालयात ‘आठवणीतले पाठक सर’ सांगतांना त्यांच्या सहकाऱ्यांचे अक्षरशः डोळे पाणावले. ‘तुमचे विचार कायम पुढे चालवू’, असे म्हणत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
करमाळा येथील जुनी भाजी मंडई परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरमधील ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलच्या कार्यालयात सोमवारी (ता. २५) ‘आठवणीतले पाठक सर’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पाठक सरांचे पूर्ण नाव भालचंद्र शंकरराव पाठक असे होते. सौंदे हे त्यांचे मुळगाव! त्यांचे वडील तत्कालीन निष्णात ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक होते. त्यांना तीन भाऊ व एक बहीण आहे. त्यांची पत्नी गृहीणी आहे तर त्यांना दोन मुली आहेत.
महात्मा गांधी विद्यालयात ते शिक्षक होते. शिक्षक सेवा कालावधीतच त्यांनी ग्राहक पंचायतीचे काम सुरू केले होते. ग्राहक पंचायतीचे मजबूत संघटन त्यांनी केले. तालुक्यातील विविध गावात ताकदीचे कार्यकर्ते त्यांनी ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून तयार केले. ऐतिहासिक साहित्याचा आभ्यास, श्री छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गडकोट किल्ले हा पाठक सरांच्या आवडीचा विषय होता. त्यांच्या आठवणी सांगतांना त्यांच्या सहकाऱ्यांना डोळ्यातील पाणी थांबवता आले नाही. पत्रकार अशोक मुरूमकर यांनी सूत्रसंचालन केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे ऍड. शशिकांत नरुटे यांनी कॉलेज जीवनात असताना सरांच्या संपर्कात कसे आलो हे सांगितले. सरांच्या माध्यमातून मोफत लायसन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. तेथून संघटनेचे काम सुरु झाले, अशी आठवण सांगितली. अभय पुराणे म्हणाले, ‘आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत पुढे कसे जायचे हे सरांनी शिकवले. आज जे काय आहे ते सरांमुळे आहे. शालेय शिक्षणापासून सरांच्या संपर्कात आलो. पुढे त्यांचा कायम संपर्क होता.’
प्रा. भीष्माचार्य चांदणे पाठक सरांची आठवण सांगताना म्हणाले, ‘सरांचं घर हे आमच्यासाठी आमचं घर होतं. सरांनी माणसात कधीही भेद केला नाही. सुखदुःखात ते कायम बरोबर होते.’ रमेश शिंदे म्हणाले, ‘मोहिमेत आल्यावर माणूस कसा घडतो हे सरांमुळे समजले. सरांनी गड किल्ले कसे पाहिचे हे सांगितले. संभाजी भिडे यांना त्यांच्यामुळे भेटता आले. सरांचे निधन झाले आहे यावर अजूनही विश्वास बसत नाही.’ पत्रकार गजेंद्र पोळ आठवण सांगताना म्हणाले, ‘पाठक सरांमुळे शेटफळची दारू बंदी झाली. त्यांच्यामुळे गावातील विजेचा प्रश्न मार्गी लागला. शेटफळ हे त्यांचे आवडते गाव होते. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.