काम पूर्ण होऊनही बील मिळत नसल्याची जातेगावच्या सरपंचाविरुद्ध तक्रार

करमाळा (अशोक मुरूमकर) : जातेगाव येथील स्मशानभूमी सुशोभीकरणाचे मंजूर काम पूर्ण होऊनही सरपंच धनादेशावर सही करत नाहीत, त्यामुळे बिल लांबले असून आर्थिक अडचण झाली असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते तुषार शिंदे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांनी तक्रारदार व सरपंच यांची सुनावणी घेतली. दरम्यान ‘संबंधित संस्थेने विश्वासात न घेता अंदाजपत्रकाप्रमाणे काम केले नसल्याने सही केली नाही’, असे स्पष्टीकरण सरपंच छगन ससाणे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना दिले आहे.

जातेगाव येथे स्मशानभूमी सुशीभीकरणासाठी निधी मंजूर झाला होता. संबंधित काम ईनिवेदाद्वारे एका संस्थेला २ लाख ५९ हजार ९३४ रुपयांना गेले होते. संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ग्रामपंचायतीने बिल देणे आवश्यक आहे. ग्रामसेवक व सरपंच यांचे सयुक्तिक सहीने धनादेशकाडून हे बिल अदा केले जाणार होते. त्यावर ग्रामसेवकांनी सही केली आहे. मात्र सरपंच यांनी सही करण्यास नकार दिला. त्यानंतर याची तक्रार गटविकास अधिकारी कदम यांच्याकडे आली.

डॉ. कदम यांनी संबंधित तक्रारीची चौकशी करत दोघांना समोर बोलावले. मात्र सरपंच आले नाहीत, असा आरोप शिंदे यांनी केला. दरम्यान ग्रामसेवक अतुल सांगडे म्हणाले, संबंधित कामाचा धनादेश देण्यात आला आहे. सरपंच यांची त्यावर सही झालेली नाही. सरपंच ससाणे म्हणाले, ‘संबंधित काम हे ज्या संस्थेकडे होते त्यांनी अंदाजपत्रकाप्रमाणे केलेले नाही. काम करताना त्यांनी विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे सही करण्यात आलेली नाही.’ तक्रारदार शिंदे म्हणाले, ‘संबंधित काम हे अंदाजपत्रकाप्रमाणे झालेले आहे. काम करताना कोणतीही तक्रार आली नाही. बिल काढतेवेळी धनादेशावर सही करण्यास नकार देण्यात आला आहे. कायदेशीर दृष्ट्या संस्था बिल मागत आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *