करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील बायपासजवळ न्यू करमाळा टाऊनशिपमध्ये उभारण्यात आलेल्या शिशिर बिल्डिंग नंबर तीन या इमारतीचे काम अपूर्ण असतानाही नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग सोलापूर शाखेचे सहायक संचालक कल्याण जाधव यांच्या शिफारशीने प्रांताधिकाऱ्यानी पूर्णत्वाचा दाखल दिला आहे. हा प्रकार माहितीच्या अधिकारात उघड झाला असून याची त्वरित चौकशी करून यातील दोषींवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी बिल्डींगधारक अभिजित वाघमोडे, प्रताप वळेकर व विजय केंडे यांच्यासह अनेक प्लॉटधारकांनी केली आहे.
करमाळा शहरात गट नंबर २२३/१ क/४/१ मध्ये न्यू करमाळा टाऊनशिप आहे. यामध्ये बिल्डिंग नंबर ३ क्षेत्र २११३.४८ चौ. क्षेत्राच्या बांधकामासाठी पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला आहे. मात्र वाघमोडे यांच्या म्हणण्यानुसार या बिल्डिंगचे अद्याप काम अपूर्ण आहे. कंपाऊंडला कलर देणे, मुरूम टाकून लेव्हल करून देणे, लाईट फिटिंग करून देणे, लिप्ट बसवणे, रेलिंग बसवणे व कलर देणे, वीज पुरवठा सुरु करणे, स्वतंत्र बोअर घेऊन देणे, पाण्याच्या टाकीला सीडी बसवणे, आरोओ फिल्टर बसवणे, बिल्डिंगला कलर देणे, सोसायटी तयार करून देणे आवश्यक आहे, असा करार झाला होता. मात्र अद्याप यातील अनेक कामे झालेली नाहीत. असे असतानाही फेब्रुवारी २०२२ मध्ये नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग सोलापूर शाखेचे सहायक संचालक कल्याण जाधव यांच्या शिफारशीने तत्कालीन उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांनी पूर्णत्वाचा दाखला दिला आहे. याची त्वरित चौकशी होऊन यातील दोषींवर कारवाई करून, बिल्डिंग धारकांना न्याय द्यावा, अशी मागणी वाघमोडे यांनी केली आहे.
संबंधित बिल्डर येथील नागरिकांना काम पूर्ण करून देतो, असे सांगत आहे. मात्र दोन वर्ष झाले तरीही काम पूर्ण केलेले नाही. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. करार करूनही कामे पूर्ण करून न दिल्याने आमची फसवणूक झाली आहे, असेही वाघमोडे यांनी म्हटले आहे.