करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्याच्या आदल्यादिवशी म्हणजे आज (सोमवार) राजकीय हालचाली देखील वाढल्या आहेत. भाजप इच्छुकांच्या मुलाखती, माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक व काँग्रेसनेही निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.
करमाळ्यात आज बागल कार्यालय येथे भाजपच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखती होणार आहेत. मुलाखती घेण्यासाठी पक्षनिरीक्षक म्हणून अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघ संचालिका रश्मी बागल यांनी ही माहिती दिली आहे. दुसरीकडे करमाळा नगरपालिकेसाठी काँग्रेसने देखील आघाडीसाठी हाक दिली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष बरोबर आले तर घेऊ अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसकडून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी दोन दिवसात तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सातलिंग शटगार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचीही आज बैठक होणार आहे.
‘करमाळा शहरामध्ये सत्ता बदलाचे वारे वाहत असून विकासाच्या मुद्द्यावर आपण शहरवासीयासमोर नवीन चेहरे समोर देऊन मतदान मागणार आहोत.’ ‘काँग्रेसच्या वतीने सर्व उमेदवारांना ताकद दिली जाणार आहे. तालुकाक्ष जगताप हे चांगले नेतृत्व आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने देशभक्त स्व. नामदेवरावजी जगताप व स्व. अण्णासाहेब जगताप यांचा मोठा हातभार आहे. त्यांच्या कार्याचा आलेख राज्याला परिचित आहे. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण वाटचाल करावी’, असे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
तालुकाध्यक्ष जगताप म्हणाले, ‘गेल्या अनेक वर्षापासून करमाळा शहरामध्ये रस्त्याची दुरावस्था आहे. धुळीचे साम्राज्य व पिण्याच्या पाण्याचा तुटवडा हे प्रश्न सामान्य नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. त्यामुळे करमाळा शहरामध्ये सत्ता बदलाचे वारे वाहत असून विकासाच्या मुद्द्यावर आपण शहरवासीयासमोर नवीन चेहरे देऊन मतदान मागणार आहोत. शहरात पुरोगामी विचाराची ताकद आहे. त्यामुळे शहरातील नागरिक निश्चितपणे काँग्रेसच्या पाठीशी उभा आहेत. त्यामुळेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले.’
‘करमाळा नगरपालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता प्रस्थापित व्हावी अशी आपली इच्छा आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षाची काय भूमिका आहे? हे अद्याप समजले नसून आपण मात्र आघाडी नाही झाली तर काँग्रेसच्या माध्यमातुन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे’ जगताप यांनी सांगितले.
