करमाळा (सोलापूर) : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंदनलिका वितरण प्रणालीमुळे बचत होणाऱ्या पाण्याचा लाभ आणखी 13 गावांना देण्यात यावा, अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार त्यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत, असे सांगण्यात येत आहे. याचा फायदा वंचित असलेल्या गावांनाहोणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
करमाळा तालुक्यात दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिकेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामामुळे योजनेच्या मंजूर असलेल्या 1.81 टीएमसी पाण्यामधून साधारण 0.46 टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. हे बचत झालेले पाणी योजनेच्या लगत असलेल्या झर, देवळाली, फिसरे, हिसरे, अर्जुननगर, सालसे, निंभोरे, मलवडी, वडशिवणे, पाथुर्डी, वरकुटे, म्हसेवाडी व रोपळे या गावांना मिळावे. याबाबत सर्वेक्षणाचे आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यानुसार फडणवीस यांनी या संबंधात कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यामुळे करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना पाण्याचा फायदा होणार आहे.
दहिगाव उपसा सिंचन योजना करमाळा तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी असून या योजनेसाठी 1.81 टीएमसी पाणी मंजूर आहे. सध्या या योजनेचे बंदनलिका वितरण प्रणालीचे काम प्रगतीपथावर आहे. यातून बचत होणाऱ्या पाण्याचा लाभ इतर गावांना मिळावा म्हणून आमदार शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत.