करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्यात सर्वत्र मोठ्या उत्सहात आज (मंगळवारी) दहीहंडी उत्सव साजरा झाला आहे. करमाळ्यात देखील मोठ्या उत्सहात गोविंदांकडून दहीहंडी उत्सव साजरा झाला. या उत्सवाला आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी करमाळा येथे भेटी दिल्या आहेत. मात्र ते दोघे एकत्र दिसले नाहीत. त्यामुळे त्यांनी एकत्र येणे टाळले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांनी कुंभारगाव येथे भेट दिली. तर शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनीही दहीहंडी उत्सवाला भेटी दिल्या आहेत.
करमाळ्यात यावर्षी मोठ्या उत्सहात दहीहंडी साजरा झाली. गायकवाड चौक येथे भाजपचे नेते गणेश चिवटे यांच्या श्रीराम प्रतिष्ठाणची दहीहंडी सर्वांचे लक्ष वेधत होती. यानिमित्ताने या चौकात बॅनरबाजी करण्यात आली होती. येथे दहीहंडीला भाजपच्या ‘कमळा’चे चिन्ह लावण्यात आले होते. हा राजकीय चर्चेचा विषय झाला. तर दुसरीकडे दत्त पेठ तरुण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडीला आमदार शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी भेट दिली.
सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेट खाटेर, मनसेचे नाना मोरे यांच्यासह श्री. परदेशी व इतर मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून हा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या मंडळाने लावलेल्या बॅनरवर शिंदे व जगताप यांचे फोटो होते. त्यांनी दोन्ही सर्व नेत्यांना निमंत्रित केले होते. आलेल्या प्रत्येक नेत्यांचे स्वागत मंडळाने केले. मात्र माजी आमदार जगताप व आमदार शिंदे हे एकाचवेळी येथे आले नाहीत. त्यामुळे त्यांनी एकत्र येणे टाळले अशी चर्चा केली जाऊ लागली आहे.
सध्या माजी आमदार जगताप व आमदार शिंदे हे एकत्र आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार जगताप यांची भूमिका महत्वाची मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार जगताप यांनी ‘मलाच या निवडणुकीत पाठींबा द्यावा’, असे विधान केले होते. त्यानंतर आजच्या कार्यक्रमात त्यांनी एकत्र येणे टाळले असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपासून जगताप यांची माजी आमदार नारायण पाटील यांच्याशी जवळीक वाढली असल्याचे बोलले जात आहे. त्यात आज ते एकत्र दिसले नाहीत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. (बागल गटाचे नेते दिग्विजय बागल हे आज करमाळ्यात नव्हते. तर भाजपच्या नेत्या रश्मी बागल यादेखील करमाळ्यात नव्हत्या, अशी माहिती मिळाली आहे.)
ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले म्हणाले, ‘आमदार शिंदे व माजी आमदार जगताप हे दोघे एकत्रच आहेत. दहीहंडीच्या कार्यक्रमाला एकत्र आले नाहीत यामध्ये वेगळा अर्थ लावण्याचे कारण नाही. शिंदे व जगताप यांचे कार्यक्रमाला येण्यापूर्वी बोलणे झाले होते. माजी आमदार जगताप हे रावगाव येथे जाधव कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीला गेले होते. त्यामुळे यामध्ये राजकीय अर्थ लावणे चुकीचे आहे.’