Special interview with District Collector Kumar Ashirwad on the occasion of Loksabha Elections

सोलापूर व माढा मतदारसंघात लोकसभेच्या दोन जागांसाठी मंगळवारी (ता. ७) मतदान होत आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची खास मुलाखत…

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान जनजागृती व मतदान केंद्रावर जिल्हा प्रशासनाकडून कशा पद्धतीने नियोजन सुरू आहे?
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, सोलापूर व माढा मतदारसंघांमध्ये 36 लाख 56 हजार 833 मतदार आहेत. यामध्ये 18 लाख 90 हजार 572 पुरुष व 17 लाख 14 हजार 976 महिला आहेत आणि 285 तृतीयपंथी मतदार आहेत. एकूण 3617 मतदान केंद्र स्थापित करण्यात आले आहेत. निवडणूक विषयीचे कामकाज ऑक्टोबर 2023 पासून सुरू आहे. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग व वरिष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. टॉयलेट आणि मोबाईल टॉयलेटची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आहे. जास्त ऊन असल्यामुळे पहिल्या फेज व दुसऱ्या फेजमध्ये मतदानाची टक्केवारी कमी झाली होती. आम्ही या अनुषंगाने यावेळी विशेष म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर ग्लुकोज आणि ओआरएस मिश्रित असलेले तीन ते चार थंड पाण्याचे जार ठेवण्यात येणार आहे. ज्या मतदान केंद्रावर मतदारांची मोठ्या प्रमाणात रांग असेल त्या ठिकाणी आम्ही तेथील मतदारांसाठी बसण्यासाठी बेंच व चेअरची सुविधा ठेवण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर वरिष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या मतदार केंद्रामध्ये पाचपेक्षा जास्त मतदान बूथ असेल त्या ठिकाणी वोटर असिस्टंट बूथची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये आम्ही प्रत्येक बूथ क्रमांकाला कलर कोडिंग केलेला आहे. कलर कोडींगप्रमाणे टी- शर्ट घातलेले स्वयंसेवक त्या ठिकाणी मदतीसाठी सज्ज असतील. मागीलवर्षी सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये 60.06 टक्के मतदान झाले होते. यावर्षी 70 टक्केपर्यंत मतदान होईल यासाठी जिल्हा प्रशासनाकडून भरपूर प्रयत्न केले जात आहे.

लोकशाहीत मतदानाचं काय महत्त्व आहे याविषयी काय सांगाल?
भारतीय लोकशाहीमध्ये मतदान अत्यंत महत्त्वाचे आहे. मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी स्वातंत्र्य संग्रामात अनेक स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारकांनी आपले सर्वस्व अर्पण केले. खूप कष्ट, यातना त्यानी सहन केले तरी त्यांनी माघार घेतली नाही. 1857 ते 1947 पर्यंत 190 वर्षात मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी खूप मोठा संघर्ष झालेला आहे. या मोठ्या संघर्षातून आपल्याला मतदानाचा मिळालेला हक्क आपण बजावला पाहिजे. आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून आपण मतदान करावे. खूप ऊन आहे कसे बाहेर जावे हे सर्व अडचणी येतील तरी आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करावे आणि सर्वांनी मतदान करावे.

सोलापूर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत याबद्दल सांगावे?
जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा मतदारसंघ आहेत. सोलापूर लोकसभामध्ये 6 विधानसभा मतदारसंघाचा समाविष्ट आहेत. यामध्ये दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, सोलापूर शहर मध्य, सोलापूर शहर उत्तर आणि पंढरपूर या मतदारसंघाचा समावेश होतो. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण व माण या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

वंचित, बेघर, तृतीयपंथी आणि ज्येष्ठ नागरिक या मतदारांसाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी काही उपक्रम राबवले आहेत का?
सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण 285 तृतीयपंथी मतदार आहे. त्यांच्या नावनोंदणीसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. पारधी, बहुरूपी आणि भटक्या विमुक्त जमातीतील मतदारांसाठी मतदान नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून 59 कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 1934 नवमतदारांना मतदान कार्डचे वाटप करण्यात आले तसेच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून काही प्राथमिक स्वरूपामध्ये पुरस्कार देऊन नवमतदारांचा सन्मान करण्यात आले होते. यावर्षी पहिल्यांदा वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी प्रशासनाकडून गृह मतदान प्रक्रिया राबवली होती. 85 वय वर्षापुढील जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन बूथ लेव्हल ऑफिसर यांनी गृह मतदाना विषयी माहिती देऊन त्यांना गृह मतदानचे पर्याय निवडणे विषयी विचारणा करण्यात आली होती. ज्यामध्ये 3500 लोकांनी पर्याय निवडले होते. या साडेतीन हजार लोकांच्या घरी मायक्रो ऑब्झर्वर, पोलिस या पथकांना पाठवून आम्ही ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडली. आमचा हाही प्रयत्न होता की वरिष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांनी मतदान केंद्रात येऊन जर मतदान केले तर इतर सामान्य मतदारांसाठी प्रेरणादायी असेल. इतके वरिष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार जर मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रावर मतदान करत असतील तर निश्चितच सामान्य मतदारांना याची प्रेरणा मिळून ते देखील मोठ्या प्रमाणावर मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहोचतील.

नवमतदारांसाठी काही उपक्रम राबविले आहेत का?
जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून नवमतदारांसाठी कार्यक्रम राबविण्यात आले. यामध्ये एक लाख 25 हजार नवमतदारांनी मतदानामध्ये नाव नोंदवले आहे. यामध्ये 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी 115 कॉलेजमधून विविध कार्यक्रम घेऊन नवं मतदारांची नोंदणी केली. सोलापूर शहरांमध्ये कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या कामगारांना मतदानाच्या दिवशी संबंधित औद्योगिक आस्थापनाकडून सुट्टी देण्यात येत नाही, अशी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या सर्व औद्योगिक आस्थापनांची तसेच चेंबर ऑफ कॉमर्सची बैठका घेऊन कामगारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याविषयी सूचना दिल्या. लोकप्रतिनिधी कायदा 1950 अनन्व्ये कलम 135 ब मध्ये खाजगी, निमसरकारी, कंत्राटी कामगारांना मतदानाच्या दिवशी भर पगारी सुट्टी देण्याची सूचना आहेत. काही औद्योगिक आस्थापनाने आम्हाला सांगितले की जर एखादा कामगार मतदान करून आल्यानंतर आम्हाला जर त्यांनी शाहीचे बोट दाखवले तर त्याचा आम्ही सत्कार व सन्मान करू.

कामगारांना मतदान बूथपर्यंत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही व्यवस्था केली आहे का?
प्रत्येकाने मतदान केंद्रावर येऊन मतदान करण्याचा प्रयत्न करावा जर कोणी खूप आजारी असेल, दिव्यांग मतदार असतील त्यांना स्वयंसेवकाच्या माध्यमातून मतदान केंद्रापर्यंत आणण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे.

मतदान ओळखपत्रा व्यतिरिक्त इतर कोणती कागदपतत्रे मतदानासाठी ग्राह्य असतील?
मतदान ओळखपत्र व्यतिरिक्त शासनाकडून देण्यात आलेल्या 14 शासकीय ओळखपत्रापैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदार मतदान केंद्रावर दाखवू शकतात. उदाहरणार्थ आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, बँक पासबुक यासारखे ओळखपत्र दाखवून मतदार मतदान करू शकतो. बीएलओकडून प्रत्येक मतदाराला वोटर स्लिप दिली जाणार आहे. त्या वोटर स्लीपच्या पाठीमागे कागदपत्रांची माहिती दिलेली आहे.

आदर्श मतदान केंद्र कशा पद्धतीने उभारले आहे?
11 विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक मतदारसंघांमध्ये 2 पिंक सेंटर उभारण्यात आले आहे. त्या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये महिला असतील. तसेच प्रत्येक मतदारसंघ निहाय 2 दिव्यांग मतदान केंद्र आणि 2 युवा केंद्र असतील अशा पद्धतीने उभारी करण्यात आली आहे. स्त्री व पुरुष यांची वेगळी रांग असेल.

टपाली मतदानाविषयी काय सांगाल?
रँडमजेशन नुसार 42 व 43 लोकसभा मतदारसंघातील जे अधिकारी कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर आहेत. त्यांना त्यांच्याच मतदारसंघामध्ये मतदान करता यावे याकरीता इलेक्शन ड्युटी स्लिप दिलेले आहेत. ज्या ठिकाणी त्यांची ड्युटी असेल त्याच ठिकाणी ते ड्युटी स्लिप दाखवून आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात तसेच ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान दुसऱ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये असेल तर त्यांच्यासाठी आपण पोस्टल मतदान प्रक्रिया राबवली होती. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतदान केले आहे. जे सैनिक मतदार आहेत त्यांचे इलेक्ट्रॉनिक पोस्टल बॅलेट आपण त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी पाठवण्यात आले होते.

मतदाराला मतदानाच्या दिवशी मतदान स्लिप मिळाली नसेल किंवा अद्याप मतदार यादीत नाव सापडले नसेल तर त्या लोकांसाठी काय व्यवस्था असेल?
मतदारांनी आपले नाव शोधण्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन आपले नाव शोधू शकतात. बीएलओ मार्फत वोटर स्लिप दिले जाणार आहे. त्या वोटर स्लिपच्या माध्यमातून मतदार मतदानच्या ठिकाणी पोहोचू शकतात तसेच मतदार सुविधा केंद्र प्रत्येक मतदान केंद्रावर उभारण्यात आलेला आहे.

मतदानाची वेळ काय असेल?
सोलापूर लोकसभा व माढा मतदार संघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान असणार आहे. मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे. कोणी मतदार सायंकाळी सहाच्या आत जर तो मतदार रांगेत उभा असेल त्याचं मतदान होईपर्यंत मतदान केंद्र सुरू राहील जर कोणी सहाच्या नंतर मतदान केंद्राकडे आले असेल तर त्यांना मतदान करता येणार नाही.

मतदारांना काय आवाहन कराल?
जिल्ह्यातील सर्व मतदारांनी 7 मे 2024 रोजी घराबाहेर पडून सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडावे व लोकशाहीच्या या उत्साहात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *