करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातून आषाढी वारीनिमित्त अनेक वारकरी जात आहेत. अनेक वारकरी दिंड्यांच्या तर काही वारकरी एसटी बस व इतर वाहनांनी पंढरपूरला जात आहेत. अनेक दिंड्या श्री देवीचामाळ बायपास चौकातुन जात आहेत. मात्र येथून सध्या जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी केली आहे.
श्री देवीचामाळ येथील बायपास चौकातून करमाळा शहरातून श्री देवीचामाळ व नगरकडून पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. येथून जड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र सध्या येथील कोर्टी ते आवाटी रस्त्याचे काम संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे वारकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. धूळ देखील मोठ्याप्रमाणात असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी अग्रवाल यांनी केली आहे.