करमाळा (अशोक मुरूमकर) : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या ऊस बिलावरून शेतकरी कामगार संघर्ष समितीचे प्रमुख दशरथ कांबळे यांनी बागल गटासह जगताप व पाटील गटावरही निशाणा साधला आहे. ‘बागल व पाटील गटाने एकत्र येऊन जगताप गटाला बाजार समिती बिनविरोध दिली तेव्हा मकाईच्या ऊस बिलाचे काय केले असे का? विचारले नाही, असे म्हणत सत्तेसाठी तालुक्यातील पुढाऱ्यांना शेतकऱ्यांचे देणेघेणे नाही, असा घणाघात केला आहे.
थकीत ऊस बिल मिळावे या मागणीसाठी करमाळ्यात अधिकऱ्यांसमोरच शेतकऱ्याने घेतले अंगावर पेट्रोल ओतून
प्रा. रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली काल (मंगळवारी) करमाळा तहसील कार्यालयासमोर बोबाबोब आंदोलन झाले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य ऍड. राहुल सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे आदी उपस्थित होते. कांबळे म्हणाले, ‘बागल कुटुंबीयांमुळे आदिनाथ व मकाई सहकारी साखर कारखान्याचे नुकसान झाले आहे. मकाईने शेतकऱ्यांचे गेल्यावर्षीचे ऊस गाळपाचे पैसे अजूनही दिले नाहीत. साखर विक्रीच्या पैशाचे त्यांनी काय केले याचे उत्तर द्यावे. शेतकरी सध्या अडचणीत असून त्याला पैशाची गरज आहे.’
पुढे बोलताना कांबळे म्हणले, ‘मकाईबाबत बोलले की कमलाई व विहाळकडेही पैसे थकले आहेत. त्यांच्याविरुद्ध का बोलले जात नाही, असे म्हणून काही दिवसांपूर्वी उत्तर दिले जायचे. मात्र उशिरा का होईना त्यांनी थकीत पैसे दिले आहेत. त्यांनी पैसे दिले नाहीत तर त्यांना आता शेतकरी ऊसही देत नाही. त्यातूनच त्यांना आता दर वाढवून द्यावा लागला आहे. करमाळा तालुक्यातील शेतकरी हा सुज्ञ आहे,’ असे म्हणतानाच तालुक्यातील जगताप व पाटील गटावरही त्यांनी निशाणा साधला.
कांबळे म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांपूर्वी बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली. यासाठी मोहिते पाटील यांनी जगताप, पाटील व बागल गटाच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्यात पाटील व जगताप यांनीही मकाईच्या बिलाबाबत विचारणा केली नाही. या थकीत बिलाबाबत त्यांचे नेमके काय मत आहे? सत्तेसाठी तुम्ही एकत्र येता मात्र शेतकऱ्यांच्या बिलासाठी काहीच बोलत नाहीत’, असे म्हणत कांबळे यांनी टीका केली आहे.