नवी दिल्ली : कथीत मद्य गैरव्यहावर प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजीरवाल यांना तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने अटक केली आहे. उत्पादनशुल्क गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी वारंवार समन्स बजावूनही मुख्यमंत्री केजीरवाल यांनी दुर्लक्ष केले होते. ते दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे समन्वयक आहेत. केजीरवाल यांच्या घराची सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री झाडाझडती घेतली. केजरीवालांचे दूरध्वनी जप्त करून त्यांची दोन तासांपेक्षाही अधिककाळ चौकशी करण्यात आली.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी चौकशीसाठी हजर राहावे म्हणून त्यांना दहाव्यांदा समन्स बजावण्यात आले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने याच प्रकरणात त्यांना दिलासा द्यायला नकार दिल्यानंतर सायंकाळी ‘ईडी’चे अधिकारी त्यांच्या घरी जाऊन धडकले. केजरीवाल यांच्या उत्तर दिल्लीतील सिव्हिल लाईन्स येथील निवासस्थानाभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या ‘ईडी’च्या पथकात सात ते आठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. यात सह संचालक कपिल राज तसेच उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने बंगल्याच्या परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.