करमाळा (अशोक मुरूमकर) : पावसाळा संपला की सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले जाते. मात्र यावर्षी पावसाळा झाला की विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाली. या आचारसंहितेचे कारण करत दरवर्षी होणारी कामे देखील लांबली होती. आता आचारसंहिता संपून आठ दिवस झाले तरी नेहमी होणारी कामे सुरु झालेली नाहीत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पावसाळ्यात रस्त्यावरील पाण्याचा निचरा न झाल्याने खड्डे पडतात. पावसाळा झाला की खड्डे बुजवायचे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दरवर्षीचेच काम असते. पावसाळा झाला की साखर कारखाने सुरु होतात. या खड्यातून ऊसाची वाहतूक करणेही कठीण होते. यावर्षी आचारसंहितेचे कारण करत खड्डे बुजवण्याचे काम लांबले आहे. आता पावसाळा संपला आहे आणि आचारसंहिताही संपलेली आहे तरी प्रमुख रस्त्यावर कोठेही खड्डे बुजवण्याचे काम सुरु असल्याचे दिसत नाही.
सध्या साखर कारखाने सुरु झाले असून ऊस वाहतूकही होत आहे. मात्र रस्त्यावर खड्डे असल्याचे त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहन चालकांची कसरत होत आहे. पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी मुरूम टाकण्यात आला होता. मात्र आता वाहन गेल्याने याची धूळ उडत आहे. करमाळा- जामखेड रस्त्यावर तर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत.