करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथून करमाळा जामखेड मार्गे बीड व औरंगाबाद एसटी बस सुरू करा, अशी मागणी करमाळा व जामखेड येथील प्रवासी संघटनेकडून करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा व अहमदनगर जिल्ह्यातील विभाग नियंत्रक तसेच जामखेड व मंगळवेढा आगार व्यवस्थापक यांना जामखेड येथील डॉ. कासम रहीम शेख व करमाळा येथील प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष अविनाश जोशी यांनी ही मागणी केली आहे.
सध्या जामखेड येथून पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व कोल्हापूरकडे करमाळा टेंभुर्णी मार्गे जाणारी एक ही बस नाही. त्यामुळे जामखेड तालुक्यातील तसेच करमाळा तालुक्यातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे दरवर्षी बीड, नांदेड ,परभणी, औरंगाबाद आदी जिल्ह्यातील ऊसतोड मजूर करमाळा जामखेड तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने येतात. थेट बसेस नसल्याने त्यांना गाड्या बदलत यावे लागते.
पंढरपूर, करमाळा, मंगळवेढा ही प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहेत. त्यामुळे जामखेड, बीड व आष्टी भागातून करमाळा मार्गे बस उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रवाशांची व शासकीय कर्मचारी, वारकरी यांची गैरसोय होत आहे, असेही डॉ. कासम शेख यांनी निवेदनाद्वारे विभाग नियंत्रक सोलापूर व विभाग नियंत्रक अहमदनगर यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.