करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सावडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र एकाड यांच्यावर दाखल झालेला अविश्वास ठराव बारगळला असल्याचे समजत आहे. अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर आज (गुरुवारी) प्रभारी तहसीलदार विजयकुमार यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता सर्व सदस्यांची विशेष सभा बोलवण्यात आली होती. मात्र या सभेकडे एकही सदस्य फिरकला नाही. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सावडी ग्रामपंचायतीत ११ सदस्य आहेत. त्यातील १० सदस्यांनी उपसरपंच एकाड यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला होता. एकाड हे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. ठराव दाखल केल्यानंतर तो ठराव मंजूर की अमंजूर हे ठरवण्यासाठी प्रभारी तहसीलदार जाधव यांनी सभा बोलावली होती.
या सभेसाठी गामपंचायत सदस्य महादेव येदवते, सागर भराटे, मारुती तळेकर, पूनम ठेंबे, कोमल एकाड, सिंधबाई ठोबरे, कोमल जाधव, रामचंद्र शेलार, शैला जाधव, शशिकला शेळके व महेंद्र एकाड यांना नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार प्रभारी तहसीलदार जाधव हे यंत्रणेसह ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. मात्र तेथे सदस्य आले नाहीत. त्यामुळे सभा झालेली नाही.
हा ठराव दाखल झाल्यापासून सभेकडे लक्ष लागले होते. येथे आमदार शिंदे गटाची सत्ता आहे. मात्र अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर प्रचंड राजकीय घडामोडीना वेग आला. आणि सभेच्यावेळी मात्र कोणीच थांबले नाही. त्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे. बागल व शिंदे गटाचे कार्यकर्ते येथे एकत्र आले असल्याची चर्चा आहे.