घरपट्टीवरील वाढीव व्याज रद्द करण्याची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिका हद्दीत घरपट्टीवरील व्याज तात्काळ रद्द करून मालमत्ताधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते नगरसेवक प्रशांत ढाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनी (शिंदे गट) केली आहे. मुख्याधिकारी सचिन तपसे यांची भेट घेऊन निवेदन देत ही मागणी केली आहे.

नगरपालिकेने घरपट्टीवरील केलेली वाढ व त्यावरील व्याज ही सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारे आहे. त्यांच्यासाठी ही आर्थिक भुर्दंड ठरत आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांवर आधीच विविध करांचा ताण असताना वाढीव घरपट्टीमुळे थकबाकीदारांची अडचण अधिक वाढत आहे. अनेक मध्यमवर्गीय व सर्वसामान्य कुटुंबांना व्याज भरणे परवडणार नसल्याने ती तात्काळ मागे घ्यावी, अशी भूमिका माजी आमदार जयवंतराव जगताप गटाच्या नगरसेवकांनी मांडली आहे.

माजी आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या नगरसेवकांनी या मागणीला जाहीर पाठिंबा दर्शविला. सरकारच्या ‘अभय योजने’अंतर्गत मालमत्ता करावरील व्याज माफ करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना 50 टक्के व्याज माफ करायचा व नगरविकास खात्याअंतर्गत शंभर टक्के व्याज माफ करण्याचा अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या संदर्भातील ठराव नगरपालिकेच्या सभागृहात मांडण्यात आल्यास शिवसेनेचे पाचही नगरसेवक त्या ठरावाच्या बाजूने मतदान करतील, असे ढाळे यांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांना आर्थिक दिलासा देणे हीच आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक युवराज चिवटे, अश्विनी कांबळे अब्दुले, सुवर्णा आलाट, साजेदा कुरेशी आदी उपस्थित होते. दरम्यान, घरपट्टीवरील वाढीव व्याजदराच्या निर्णयामुळे शहरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *