करमाळा (अशोक मुरूमकर) : शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्सहाचे वातावरण आहे. करमाळा तालुक्यातील आमदार संजयमामा शिंदे यांनीही पाठींबा जाहीर केला असल्याने शिंदे गटात आनंदाचे वातावरण आहे. लवकरच अजित पवार यांचा करमाळा दौरा होणार असून त्यांच्या हस्ते सोलापूर आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या भीमा नदीवरील डिकसळ पुलाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (बुधवारी) मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी त्यांना पाठींबा जाहीर केला आहे. आमदार शिंदे हे सुरुवातीपासून त्यांना नेते मानतात. आमदार शिंदे हे अपक्ष असले तरी त्यांची राष्ट्रवादीशी जवळीक असून अजितदादा पवार यांनाच ते नेते मानतात. त्यामुळे करमाळा तालुक्यातील रखडलेली कामे मार्गी लागतील, असा विश्वास त्यांच्यामध्ये आहे.
सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणारा भीमा नदीवरील ब्रिटिशकालीन पुल धोकादायक झाला आहे. त्यामुळे येथे नवीन पूल तयार केला जाणार आहे. या पुलाला कार्यारंभ आदेशही झालेला आहे. ‘अजितदादा पवार यांनी या पुलासाठी मोठी मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांच्याच हस्ते या पुलाचे भूमिपूजन केले जाईल,’ अशी चर्चा सुरु असून यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित राहतील, असे सांगितले जात आहे.
डिकसळ पूल हा दळणवलनाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हेही अजित पवार यांच्याबरोबर आहेत. करमाळ्याचे आमदार शिंदेही अजित पवार यांच्याबरोबर आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हेही भाजपमध्ये आहेत. त्यामुळे आता या पुलचे काम लवकर सुरु होईल, अशी अशा करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील आमदार शिंदे यांच्या गटातील कार्यकर्त्यांना आहे.