करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील नेर्ले येथील एका शेतकऱ्यावर काळाने घाला घातला आहे. शेतात बोअरमध्ये अडकलेली मोटार कप्पीच्या सहाय्याने काढताना पाईप मोडून डोक्यात पडल्याने गंभीर जखमी होऊन शेतकरी ठार झाला आहे. भीमराव लाला गोडसे (वय 59) असे ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या शेजारील शेतकऱ्याच्या शेतात ते कामाला गेले होते. तेव्हा हा प्रकार घडला आहे.
नर्ले येथील गोडसे यांची सात एकर शेती आहे. त्यांची शेती हंगामी बागायती आहे. त्यामुळे ते मजुरीला जातात. त्यांच्या शेजारील शेतकरी विष्णु बनसोडे यांच्या शेतातील बोअरमध्ये मोटर अडकली होती. ती मोटर काढण्यासाठी गावातील अण्णासाहेब हनुमंत गवळी यांची इलेक्ट्रिक कप्पी लावली होती. दोन दिवस त्यांनी मोटर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली त्या दिवशी कप्पीवले गवळी हे ठार झालेले गोडसे यांना मोटर काढण्यासाठी घेऊन गेले होते. ‘उद्या पहाटेची लाईट आहे. उन्हाच्या आधी मोटर काढू दुपारी तू लवकर सुट्टी कर’, असे म्हणून ते त्यांना घेऊन गेले. काम सुरू असताना कप्पीचा पाईप मोडून वडिलांच्या डोक्यात पडला. त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
यामध्ये गोडसे हे एवढे गंभीर जखमी झाले की, त्यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्राव झाला. त्यांना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. यामध्ये काम करताना सुरक्षितता न बाळगल्याप्रकरणी कप्पीवाला गवळीविरुद्ध कलम 304 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. 30 मे रोजी हा प्रकार झाला होता. त्यानंतर 3 जुलैला संशयित आरोपी गवळीविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे.