करमाळा (अशोक मुरूमकर) : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची करमाळा तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी भेट घेतली आहे. या भेटीवेळी माढा लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली असल्याचे समजत आहे. निलेश लंके यांच्या प्रचाराचा काल (सोमवारी) शुभारंभ झाला. या दरम्यान वारे वर पाटील यांची भेट झाली. हॅलीपॅडवर वारे यांनी पाटील यांचे स्वागत केले. त्यानंतर जयंत पाटील यांनी त्यांना त्यांच्या गाडीत घेऊन चर्चा केली आहे. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समजला नाही, मात्र निवडणुकीच्या तोंडावर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण तापत आहे. त्यात माढा मतदारसंघात उमेदवारीवरून उत्सुकता वाढली असून शरद पवार गट कोणाला उमेदवारी देणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांची राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा आहे, मात्र ते प्रवेश करतील की पुन्हा ते भाजपमध्येच थांबणार यावर वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार नारायण पाटील यांनीही ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी मागणी होत आहे. अभयसिंह जगताप यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र अजून कोणतेही नाव निश्चित झालेले नाही. त्यात वारे यांची भेट महत्वाची मानली जात असून त्यांच्याकडून त्यांनी माढा मतदार संघातील माहिती घेतली असल्याची चर्चा आहे.