करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केला असून महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील यांचे नाव निश्चित मानले जात आहे. तर महायुतीकडून दिग्विजय बागल यांना उमेदवारी मिळेल असे बोलले जात आहे. मात्र शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनीही येथे दावा केला आहे. त्यामुळे येथे नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार आणि लढत दुरंगी होणार की बहुरंगी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्याची घाई प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यालयात सुरू आहे. करमाळा मतदारसंघातून आमदार शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. २०१९ मध्येही आमदार संजयमामा शिंदे हे अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले होते. आताही त्यांनी अपक्षच लढावे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा भाजप लढवणार असल्याची माहिती आहे. भाजपकडून माजी मंत्री दिगंबरराव बागल मामा यांचे चिरंजीव मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल हे ‘कमळा’च्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.
भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी दिग्वजीय बागल यांना आमदार करण्याचे आवाहन केले आहे. करमाळा मतदारसंघात दिग्विजय बागल की रश्मी बागल निवडणूक रिंगणात उतरतील याकडे लक्ष आहे. मात्र आता स्वतः रश्मी बागल या दिग्विजय बागल निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेत देत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी बागल गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने दिग्विजय बागल यांना जिल्हा नियोजन समितीवरही संधी दिली होती.
करमाळा हा अखंड शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या धन्युष्यबाणावर रश्मी बागल या रिंगणात होत्या. २०१४ मध्ये माजी आमदार नारायण पाटील हे धन्युष्यबाणावर निवडणूक रिंगणात होते. आताही ही जागा शिवसेनेलाच सुटावी अशी मागणी चिवटे यांची आहे. आमदार शिंदे यांची राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याशी जवळीक आहे. पण त्यांनी कधीही पक्ष प्रवेश केलेला नाही आणि ते अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. ते अपक्ष लढले येथील जागा कोण लढणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.