करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पाटील गटाला कार्यकर्त्यांनी चांगला कौल दिला आहे. आठ ग्रामपंचायतीमध्ये माजी आमदार नारायण पाटील गटाची सत्ता आलेली आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणारे हे यश असून तालुक्यात आणखी चांगले काम करून गट वाढविण्यावर भर दिला जाणार आहे, असे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.
तळेकर म्हणाले, पाटील गटाच्या हाती तालुक्याची सत्ता नसतानाही मतदार आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहेत. मतदारांच्या या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. १६ पैकी आठ ग्रामपंचायतीवर आमच्या कार्यकर्त्यांच्या हाती नागरिकांनी सत्ता दिली आहे. जेऊर, चिखलठाण, राजुरी, भगतवाडी, कंदर, रावगाव, कावळवाडी, केम येथे आमची सत्ता आहे. या सत्तेच्या माध्यमातून नागरिकांना न्याय देण्याचे काम केले जाईल.
पुढे बोलताना तळेकर म्हणाले, ‘या निकालामुळे पाटील गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. पाटील गटाबरोबर जनाधार असल्याचे यावरून सिद्ध होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबल्यामुळे अनेक प्रमुख कार्यकर्ते या निवडणुकीत उतरले होते. त्यात ते विजयीही झाले. याचा फायदा पाटील गटाला निश्चित होणार आहे. ३० वर्षांपूर्वी गावागावात नारायण आबा पाटील युवा मंच स्थापन केले होते. आता पाटील गटाचे नुवा नेते जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा या युवा मंचची पुनर्बांधणी करून गट वाढवण्यावर भर दिला जाईल. या निकालाचा नक्कीच पाटील गट कसा फायदा करून घेणार आहे’, असे तळेकर यांनी सांगितले आहे.