करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘गोविंदपर्वचे संचालक प्रा. रामदास झोळ यांच्याकडून सध्या करमाळा तालुक्यातील नागरिकांची फसवणूक सुरु आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या विनंतीवरून ज्या कारखान्याला ऊस दिला त्या कारखान्याकडून अजून शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर मिळाला नाही. साधी त्याची जबाबदारी देखील त्यांनी घेतली नाही. आणि आता राजकीय स्वार्थासाठी पंढरपुरात शेतकरी नेते राजू शेट्टी यांना ते शेतकऱ्यांना ऊस बिल मिळवून देण्यासाठी आंदोलन करू असे सांगत आहेत. त्यांच्या अशा खोट्या पाठींब्याची गरज नाही,’ असे धंनजय कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.
राजुरी येथील बंद पडलेल्या गोविंदपर्व या कारखान्याचा ऊस बील प्रश्न विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पेटला आहे. ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने सर्वात आधी हा प्रश्न मांडला होता. दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. झोळ यांचे सासरे लालासाहेब जगताप यांनी त्यावर स्पष्टीकरणही दिले होते. ऊस बिलासाठी शेतकरीही एकवटले आहेत. प्रा. झोळ हे या कारखान्याचे संचालक आहेत. याप्रकरणात करमाळा न्यायालयात सुरु असलेल्या दाव्यात प्रा. झोळ हे प्रतिवादी आहेत. अनेक कागदपत्रात ते संचालक असल्याचा उल्लेख आहे. मात्र तरीही जगताप यांनी ते संचालक नसल्याचे सांगत सारवासारव केली. पण शेतकरी त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. योग्यवेळी त्यांना आम्ही उत्तर देणार आहोत. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची भेट घेऊन आम्ही वास्तव सांगणार आहोत. स्थानिक कार्यकर्ते त्यांच्या आर्थिक स्वार्थासाठी शेट्टी यांना खोटी माहिती देत आहेत, असा आरोपही कांबळे यांनी केला आहे.
कांबळे म्हणाले, वास्तविक कारखान्यावर राजकारण करून प्रा. झोळ यांना विधानसभा लढवायची आहे. तुम्ही कमलाई, आदिनाथ, मकाई व विहाळ येथील कारखान्याच्या ऊसबिलासाठी आंदोलन केले. पण यापूर्वी कधी तुमच्या सासऱ्याच्या आणि तुम्ही संचालक असलेल्या गोविंदपर्वचा उल्लेख तरी केला का? आम्ही सनदशीर मार्गाने यावर अवाज उठवायला सुरुवात केल्यानंतर तुम्ही आंदोलन करण्याची भाषा करत आहात तुमच्यावर आमचा विश्वास नाही. शेतकऱ्यांची फसवणूक करून नका, असे ते म्हणाले आहेत.