करमाळा (अशोक मुरूमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास राहिलेले असताना बागल गटाला तिसरा दिलासा मिळाला आहे. बागलविरोधी गटाने चार चार पात्र उमेदवारांविरुद्ध दाखल केलेले अपील उच्च न्यायालयाने फटाळले आहे. त्यामुळे प्रा. रामदास झोळ यांच्या गटाला पुन्हा एक धक्का बसला आहे.
मकाई निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पात्र ठरवलेल्या रामभाऊ हाके, संतोष पाटील, नवनाथ बागल व बाळासाहेब पांढरे यांच्यावर आक्षेप घेत बागलविरोधी गट उच्च न्यायालयात गेला होता. त्यावर आज (सोमवारी) निकाल आला असल्याची माहिती बागल गटाच्या संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे. याप्रकरणात पंढरपूर येथील ऍड. सारंग आराध्य यांनी बागल गटाकडून काम पहिले असल्याचे सांगण्यात येत आहे.
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विरोधी गटाचे बहुतांश अर्ज अपात्र केले. ‘ऊस गाळपाचा नियम’ यावर प्रा. रामदास झोळ व मोहिते पाटील समर्थक सविताराजे राजेभोसले यांच्यासह इतर अर्ज अपात्र केले. त्यानंतर सोलापूर येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे करण्यात आलेल्या अपिलातही त्यांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले. आता उच्च न्यायालयातही विरोधी गटाने घेलेले अपील फेटाळले आहे. मात्र बागल विरोधी गट सोलापूर येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिलेल्या निकालाविरुद्ध अपील करण्यासाठी आज न्यालयालयात जाणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र गोडगे यांनी दिली आहे.