अशोक मुरूमकर : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण चांगलेच तापू लागले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना माढा लोकसभा मतदारसंघात आहे. भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात ही लढत आहे. दोघांकडूनही जोरदार प्रचार सुरु झाल्याने मतदारही आता मत कोणाला द्यायचे याचा विचार करू लागले आहेत. की मतदार द्विदा मनस्थितीत आहेत, असे दिसत आहे. आणखी प्रचारासाठी कालावधी आहे, त्यानंतर वातावरण कसे असेल यावर येथील चित्र स्पष्ट होणार आहे.
ग्रामीण भागात भाजपविरोधी लाट आहे. तर शहरी भागात भाजपला वातावरण असल्याचे दिसत आहे. करमाळा शहरात ग्रामीण भागातून रोज अनेकजण येतात. चहाची टपरी किंवा कृषी संबंधीत दुकानांमध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचीच चर्चा असल्याचे दिसत आहे. निंबाळकर की मोहिते पाटील याच चर्चा रंगत असून दोन्ही बाजूचे समर्थक आपली बाजू मांडताना दिसत आहेत.
जीन मैदान परिसरात शेतीच्या संबंधित एका दुकानात काही शेतकऱ्यांच्या गप्पा सुरु होत्या. ‘भाजपच्या धोरणामुळे शेतीचे कसे नुकसान झाले हे ते सांगत होते. भाजपने शेतकऱ्यांना हमी भाऊ दिला नाही. दुष्काळ अनुदान दिले. मात्र दुष्काळ पडल्यामुळे ते त्यांनी अनुदान दिले आहे. शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे दिले मात्र महागाई किती वाढली आहे, असे ते सांगत होते. शेतात गेले की भाजपला मतदान करू वाटत नाही. परंतु सांगली, पुणे, नगरला जायचे म्हटलं की वाटत भाजपलाच मतदान करावे. भाजपने रस्त्याची खूप चांगली कामे केली आहे. कोठेही जायचे म्हटले तरी तत्काळ जाता येते. त्यामुळे रस्त्यावर गेले की विचार बदलत आहे,’ असं ते सांगत होते.
माढा लोकसभा निवडणूकीचा प्रचार मध्यावर आला आहे. या प्रचारामुळे वातावरण निर्मितीही होऊ लागली आहे. भाजपने निंबाळकर यांना उमेदवारी न दिल्यामुळे नाराज झालेले मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात जात उमेदवारी घेतली आहे. त्यांच्याबरोबर माजी आमदार नारायण पाटील आहेत. निंबाळकर यांच्याबरोबर आमदार संजयमामा शिंदे, आमदार बबनदादा शिंदे, शहाजी बापू पटली, जयकुमार गोरे असे नेते आहेत. या निवणुकीत दोन्ही बाजूने सध्या दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे मतदानादिवशी कोणाला कौल दिला जाईल, हे पहावे लागणार आहे.