(अशोक मुरूमकर)
वेळ काल (शनिवार) दुपारी साडेचार वाजताची… सर्व पत्रकार आपापल्या कामात असताना पत्रकार परिषद असल्याचा निरोप देण्यात आला, ठिकाण आणि वेळही देण्यात आली. ती पत्रकार परिषद होती बागल गटाच्या संचालकांनी बोलावलेली. हा निरोप देतानाच नेत्यांचा यामध्ये संबंध नसून फक्त संचालकांना माध्यमांशी बोलायचे आहे, असे सांगण्यात आले होते. बागल गटाची पत्रकार परिषद असल्याने नेमके काय सांगितले जाणार याची उत्सुकता होती. ‘काय सांगता’ने तर याचे वृत्तही दिले होते आणि ते प्रचंड व्हायरलही झाले होते. हे वृत्त व्हावे अशी काही कार्यकर्त्यांची इच्छाही होती. तशी त्यांनी अपेक्षाही व्यक्त केली होती. मात्र काही वेळातच ही पत्रकार परिषद रद्द झाल्याचे सांगण्यात आले. तो पर्यंत अनेकांना याची माहिती झाली होती मात्र पत्रकार परिषदच न झाल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
बागल गट सध्या भाजपमध्ये आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य देण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी ताकद लावलेली आहे. मात्र मकाई कारखान्याची थकीत ऊस बिले हा सर्वात मोठा अडथळा त्यांच्यासमोर उभा आहे. मकाई व आदिनाथ कारखाना अडचणीत आणण्यात बागल गटाच्या विरोधकांचा मोठा डाव होता, असे बोलले जाते. मात्र तरीही शेतकऱ्यांचे ऊस बिल देणे ही आमची जबाबदारी असल्याचे सांगत आम्ही एक रुपयाही कोणाचा ठेवणार नाहीत, असे गटप्रमुखांकडून सांगितले जात आहे. मात्र राजकीय हेतून त्यांना कोंडीत पकडण्याचा संधी काही विरोधक सोडत नाहीत. सहकारी साखर कारखान्यांपुढील अडचणी आणि बागल गटाचा तालुक्यातील राजकारणावर असलेला प्रभाव हे लक्षात घेऊन त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. बागल गटाला ‘गॉडफादर’ची आवश्यकता होती. योग्य निर्णय घेऊन त्यांनी भाजप प्रवेश केलाही मात्र एन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा हा प्रवेश झाला आहे. त्यामुळे अडचणी कशा दूर होतील, हे पहाणे महत्वाचे आहे.
निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना बागल गटाने शक्तिप्रदर्शन केले होते. कोणताही गाजावाजा न करता निष्ठावंत कार्यकर्त्यांनी एकत्र ठेवण्यात त्यांना यश आले, असल्याचे त्यातून दिसले होते. याची पत्रकारांमध्येही चर्चा झाली होती. त्यानंतर पाचव्याच दिवशी बागल गटाच्या संचालकांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यामुळे कारखान्याचा प्रश्न मार्गी लागला असा अंदाज वर्तवला जात होता. या पत्रकार परिषदेत बागल गट काहीतरी घोषणा करेल अशी शक्यता असल्याने करमाळा शहरातील पत्रकारांना व नागरिकांना याची उत्सुकता होती. ग्रामीण भागातील पत्रकारांना निरोप मिळाले होते, त्यामुळे वादळी वातावरण असतानाही ते करमाळ्याच्या दिशेने निघाले. मात्र तेवढ्यात पत्रकार परिषद रद्द झाल्याचे सांगण्यात आले.
बागल गटाच्या संचालकांनी बोलावलेली ही पत्रकार परिषद रद्द का केली हे समजू शकलेले नाही. दरम्यान काही पत्रकारांनी बागल कार्यालय येथेही याबाबत संपर्क साधला होता. मात्र आम्ही निरोप दिला नसल्याचे सांगण्यात आले होते. पत्रकार परिषद होण्यापूर्वी ठिकाणही बदलण्यात आले होते. बागल गटाच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष होते. ‘काय सांगता’ने याचे वृत्त दिले होते. हजारो वाचकांनी हे वृत्त पाहिले होते. मात्र पत्रकार परिषदच रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज लावले जात असून याची चर्चा केली जात आहे.