करमाळा (अशोक मुरूमकर) : हालगी- ताशाच्या गजरात लेझीम, टिपरी खेळत, मर्दानगी खेळाचे सादरीकरण करत नाचत- गात गुलालाची उधळण करत करमाळ्यात ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्यावर्षी लवकर या’च्या जयघोषात गणेशभक्तांनी लाडक्या गणरायाला शनिवारी (ता. ६) निरोप दिला. ‘डीजे’मुक्त मिरवणूक या प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत ठरवून दिलेल्या वेळेच्या आधीच १५ मिनिटे फुलसौन्दर चौकातून शेवटची गणेशविसर्जन मिरवणूक गेली.

डीजेमुळे नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे कोणत्याही गणेशोउत्सव मंडळाने ठरवून दिलेल्या वेळेत आवाजाची मर्यादा ठेवत मिरवणुका काढाव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. कोण आवाजाची मर्यादा ओलांढत आहे का? यावर स्वतः करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा व पोलिस निरीक्षक रणजित माने लक्ष ठेऊन होते. फुलसौन्दर चौकात प्रशासनाच्या वतीने गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांसह नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्यासह परीक्षण समितीचे सदस्य पोलिस पाटील संदीप शिंदे, प्रदीप बालदोटा, प्रा. विष्णू शिंदे व पत्रकार अशोक मुरूमकर उपस्थित होते. पोलिसांच्या नियोजनामुळे वेळेआधी १५ मिनिटे मिरवणुका संपल्या. आणि डीजेबाबतची केलेली अमंलबजावणी यशस्वी झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी आभार मानले. डीजे नसताना सुद्धा बेंजोच्या तालात मंडळातील भक्तांनी ठेका धरला. पारंपरिक वाद्याच्या तालात अनेक मंडळांनी कला सादर केली.
अशी झाली मिरवणूक…
करमाळा येथील गणेशोत्सव मिरवणुका ‘डीजे’शिवाय निघाल्या. श्रीदेवीचामाळ येथील मानाचा पहिला गणपती साडेसात वाजता वेताळ पेठेतील जामा मशिद येथे आला. मुस्लिम बांधवांकडून या गणपतीला पुष्पहार अर्पणकरून पुष्पवृष्ठी करण्यात आली. हत्तीवर विराजमान झालेल्या या गणरायाच्यापुढे गणेशभक्तांनी पारंपरिक वाद्यात कला सादर केली. त्यानंतर फुलसौंदर चौकातून पावणेआठ वाजता ही मिरवणूक पुढे गेली. करमाळा शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास मिरवणूक आली होती. या मंडळाच्या मागे सर्व गणेशविसर्जन मिरवणुका निघाल्या.
किल्लावेस येथे गुलालाची उधळण
किल्लावेस येथे श्रीदेवीचामाळ येथील राजेरावरंभा तरुण मंडळाच्या गणरायाची मिरवणूक आल्यानंतर गुलालाची उधळण झाली. तेथून वेताळपेठेतून मिरवणूक पुढे गेल्यानंतर मानाचा दुसरा लोकप्रिय हनुमान तरुण मंडळाची मिरवणूक निघाली. त्यानंतर किल्ला विभागातील लोकमान्य टिळक तरुण मंडळ मानाचा तिसरा गणपतीची मिरवणूक निघाली.

२१ मंडळाच्या विसर्जन मिरवणूका
करमाळ्यात शनिवारी २१ गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या. श्रीदेवीचामाळ येथील राजेरावरंभा तरुण मंडळ, किल्लावेस येथील लोकप्रिय हनुमान तरुण मंडळ, किल्ला विभागातील लोकमान्य टिळक तरुण मंडळ, हिंदवी प्रतिष्ठान, फंड गल्लीतील लोकमान्य टिळक तरुण मंडळ, खडकपुरा येथील गणेश तरुण मंडळ, रंभापुरतील राजे ग्रुप, खाटीक गल्लीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी तरुण मंडळ, किल्ला विभाग मित्र मंडळ, सुमंतनगर येथील नागनाथ मित्र मंडळ, सावंत गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, राशीन पेठ तरुण सेवा मंडळ, गजराज तरुण मंडळ, जय महाराष्ट्र तरुण मंडळ, सरकार मित्र मंडळ, कानाड गल्लीतील महर्षी वाल्मीकी मित्र मंडळ, भवानी पेठमधील शिवबा ग्रुप, कानाड गल्ली मित्र मंडळ, गंगाराम तरुण मित्र मंडळ, तेली गल्लीतील सहकार मित्र मंडळ व सुतार गल्लीतील नवजवान सुतार तालीम मित्र मंडळ.
आकर्षक सजावटी
करमाळा शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत गणरायासाठी आकर्षक सजावटी करण्यात आल्या होत्या. राशीन पेठ, सरकार मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, गजराज मित्र मंडळ, सहकार मित्र मंडळ, सावंत गल्ली, गंगाराम तालीम, हिंदवी आदी मंडळाने आकर्षक सजावटी केल्या होत्या.
40 वर्षाची परंपरा कायम
करमाळ्यात सकल मुस्लिम समाजाच्या वतीने गणरायांच्या भव्य मिरवणुकीवर जामा मशीदमधून पुष्पवृष्टी केली जाते. ४० वर्षांची परंपरा मुस्लिम समाजबांधवांनी यावर्षीही कायम ठेवली आहे. हिंदू- मुस्लीम एकतेचा आगळावेगळा दर्शन यामुळे करमाळा शहरात दिसले. गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी मानाच्या पहिला गणपती श्रीदेवीचामाळ येथील कमलाभवानी देवी मंदिरातील राजेरावरंभा तरुण मंडळाच्या गणरायाचे व विसर्जन मिरवणुकीत सहभागी सर्वच सहभागी गणरायांचे स्वागत मशिदीतून पुष्पवृष्टी करून केले जाते. करमाळा जामा मस्जिदचे अध्यक्षीय विश्वस्त जमीरभाई सय्यद व सदस्य यांच्या पुढाकाराने व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाउंडेशन व सकल मुस्लीम समाजच्या वतीने ही पुष्पवृष्टी करण्यात आली.
