करमाळा (अशोक मुरूमकर) : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेने जिल्ह्यात सर्व तहसील कार्यालयाच्या आवारात सेतू कार्यालयासमोर क्यूआर कोडचे डिजिटल झळकले आहे. करमाळ्यातही असेच एक फलक झळकले आहे. मात्र हा क्यूआर कोड कशाचा आहे याची माहिती आहे का? सेतू कार्यालयातील गैरव्यहवाराबाबत तक्रारी करण्यासाठी हा क्यूआर कोड लावण्यात आला आहे.
करमाळ्यात तहसीलच्या आवारातील पुरवठा विभाग व सेतू कार्यालय येथे या क्यूआर कोडचा फलक आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर नागरिकांना स्वतःच गैरव्यहवाराबाबत तक्रार करता येणार आहे. केंद्र चालकाने सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे घेतले तर यावर तक्रार करता येणार आहे. संबंधित दाखला वेळेत दिला नाही किंवा विलंब केला तरीही तक्रार करता येणार आहे. दाखल्यासाठी अर्ज केल्यानंतर मोबाईलवर मेसेज आला नाही, एजंटकडूनपैशाची मागणी यासह इतर तक्रारी मोबाईलवरून क्यूआर कोड स्कॅन करून तक्रार करता येणार आहे. याला कसा प्रतिसाद मिळतो हे पहावे लागणार आहे.