करमाळा (सोलापूर) : करमाळा अर्बन बँकेचे प्रशासक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयासमोर दोन जामीनदारांनी आजपासून (सोमवार) अमरण उपोषण सुरु केले आहे. यातील जामीनदार नगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी व दुसरे कार्यरत कर्मचारी आहेत. गजानन राक्षे व प्रदीप शिंदे यांनी हे उपोषण सुरु केले आहे.
करमाळा अर्बन बँकेचे कर्जदार मल्हारी चांदगुडे यांना ते जामीनदार आहेत. बँक सध्या अडचणीत असून सध्या त्यावर आरबीआयचे निर्बंध आहेत. बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ओटीएस योजना स्विकारली होती. मात्र कर्जदार चांदगुडे यांनी यामध्ये सहभागी न होता थकीत कर्ज भरले नाही. त्यामुळे जामीनदार राक्षे व शिंदे यांचे पेन्शनचे खाते सील करण्यात आले आहे.
कर्जदाराने कर्ज न भरल्याने बँकेची वारंवार नोटीस येत आहे. ओटीएसमध्ये सहभाग घेण्यासाठी संबंधीत कर्जदाराला विनंती केली आहे. मात्र कर्ज भरले जात नाही. त्यामुळे माझे बँक खाते बंद करण्यात आले आहे, असे शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे. या उपोषणाला बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी पाठींबा दिला आहे.