करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (सोमवारी) उडीदाचे एकदम भाव पडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. याबाबत त्यांनी तहसीलदार व सहाय्यक निंबंधक यांनाही निवेदन दिले आहे. सरकारने निश्चित केलेल्या ७ हजार ४०० त्यावर ९ हजार ९०० अशा हमीभावाप्रमाणे दर देण्याची सूचना करावी, अन्यथा बुधवारी (ता. ११) नगर- सोलापूर महामार्गावर रस्ता रोको केला जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावर्षी वेळेवर पाऊस झाल्याने करमाळा तालुक्यात उडीदाचे क्षेत्र वाढले आहे. बाजार समितीमध्ये विक्रमी आवक सुरु झाली असून योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आज व्यापाऱ्यांनी उडीदाचे भाव पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत तहसीलदार शिल्पा ठोकडे सहाय्यक निबंधक अपर्णा यादव यांना निवेदन दिले आहे. या निवेदनावर रियाज शेख, मुन्ना शेख, विलास कोळेकर, सचिन नलावडे, ज्ञानेश्वर आगम यांच्या सह्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, करमाळा बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी दराने उडीद खरेदी केला जात आहे. याबाबत जाब विचारल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. ७ हजार ४०० हमीभाव असून आज ५००० ते ६५०० दर शेतकऱ्यांना दिला जात आहे.योग्य दर मिळाला नाही. शुक्रवारी (ता. ६) अडतदार व व्यापाऱ्यांनी मिळून लिलाव बंद ठेवले होते. त्यामुळे आवक वाढलीत्याचा परिणाम झाला असल्याचे म्हटले आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
अपर्णा यादव, सहाय्यक निंबंधक, करमाळा
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीबाबत शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. उडिदाला दर मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे. याबाबत करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर यांना याची माहिती देण्यात आली आहे. याचे कारण लेखी स्वरूपात मागितले आहे. त्यांनतर पुढील निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याकडे आमचे लक्ष आहे.
जयवंतराव जगताप, माजी आमदार तथा सभापती, बाजार समिती, करमाळा
करमाळा बाजार समितीमधे शेतकऱ्यांसमक्ष उघड लिलाव, प्रतवारी व विक्री केलेल्या शेतमालाची २४ तासात मापे केली जातात व पट्टी दिली जाते. शेतमालाचा भाव बाजार समिती ठरवित नाही तर शेतकरी व व्यापारी यांच्यातील दुवा म्हणून नियंत्रण ठेवण्याचे काम बाजार समिती करते. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, जास्तीत जास्त बाजारभाव मिळावा यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी msamb ॲपवर अथवा फोनवर अन्य बाजार समितीमधील भावाची चौकशी करावी व भाव मान्य असल्यासच शेतमालाची विक्री करावी. सध्या बाजार समितीमधे उडीदाची आवक प्रचंड असून व्यापारी व हमालांची संख्या त्यांची कार्यक्षमता आदी बाबींचा विचार करता शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. काही विघ्नसंतोषी लोकांच्या भूलथापांना बळी पडू नये. प्रतिदिनी ५ ते १० हजार क्विंटल आवक असल्यामुळे ३ ते ४ कोटीची उलाढाल होत असून सणासुदीच्या तोंडावर बाजारपेठेत चैतन्य पसरले आहे. यास दुष्ट लावण्याचे काम काही नतद्रष्ट मंडळी करीत असून शेतकऱ्यांनी वेळीच सावध व्हावे. अन्यथा सरकारकडून हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे. बाजार समितीकडून गोदाम, धान्य चाळणी यंत्र आदी बाबीसाठी संपूर्णपणे सहकार्य केले जाईल.
विठ्ठल क्षिरसागर, सचिव, बाजार समिती, करमाळा
करमाळा बाजार समितीत पारदर्शक कामकाज असून अन्य बाजार समितींच्या तुलनेत उडीदाला जादा मिळत भाव आहे. faq दर्जाच्या मालाला हमीभावापेक्षा जादा दर असून non faq शेतमालाची विक्री शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय न करणेबाबत अडते व्यापारी खरेदीदार यांना सुचना दिलेल्या आहेत.