करमाळा (अशोक मुरूमकर) : कडाक्याच्या थंडीमुळे भाजपाल्याचे दर कडाडले आहेत. चिकनपेक्षा शेवगा महाग झाला असून १ नोव्हेंबरपासून करमाळ्यातून शेवग्याची शेंग गायब झाली आहे. त्यामुळे सांबरमध्ये शेवग्याएवजी भोपळा वापरला जाऊ लागला आहे. किलोला ४०० रुपयेपेक्षा जास्त दर झाल्याने सर्वसामान्य ग्राहक शेवगा घेत नाही. त्यामुळे भाजीपाला विक्रेतेही शेवगा मागवत नसल्याचे चित्र आहे.
कडाक्याच्या थंडीमुळे आवक घटल्याने पालेभाज्या स्वस्त झाल्या आहेत मात्र फळ भाज्या महागल्या आहेत. ८० ते ते ९० रुपये किलो मिळणारा शेवगा सध्या ४०० ते ५०० रुपयापर्यंत गेला आहे. ६० ते ७० रुपयाला महिन्यापूर्वी मिळणारी गवार आता १५० रुपयेच्यापुढे गेली आहे. कोथिंबीर व मेथी मात्र स्वस्त झाली आहे. थंडी आणि वातावरणातील बदलामुळे पालेभाज्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकाच्या खिशाला चाट बसत असून काही भाज्या गायब झाल्या आहेत.
साधारण नोव्हेंबरमध्ये नवीन भाजीपाल्याची लागवड होते. डिसेंबर व जानेवारीमध्ये नवीन भाजी येते. मग दर कमी होऊ लागतात. टोमॅटो, कांदा, गवारीचे दर वाढले आहेत. लसूण देखील किरकोळ बाजारात ४०० रुपये किलो असल्याचे विक्रेते सांगत आहेत. भाज्यांचे दर वाढले असल्याने गृहिणींचे किचन बजेट कोल्डले असून खवय्यानादेखील हवी ती भाजी मिळत नाही.