पालकमंत्री गोरे व सावंत यांच्यात भेट! करमाळ्याच्या विकासासाठी निधी मिळवण्याच्या दृष्टीने शहर विकास आघाडीच्या हालचाली!

करमाळा (अशोक मुरूमकर) : नगरपालिका निकालाच्या यशानंतर सावंत गटाच्या (करमाळा शहर विकास आघाडी) (KSVA) करमाळा शहराच्या विकासासाठी निधी मिळवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सावंत गटाचे प्रमुख सुनील सावंत यांनी भेट घेतली आहे. यावेळी नगरपालिकेत मिळवलेल्या यशामुळे गोरे यांनी सावंत यांचे अभिनंदन केले असून विकासासाठी निधी देणार असल्याचे सांगितले आहे.

करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत सावंत गटाने करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचे (शिंदे गट) माजी आमदार जयवंतराव जगताप यांची ३० वर्षाची सत्ता उलथून लावली आहे. सावंत गटाने नगराध्यक्षपदासह नऊ जागांवर विजयी मिळवला आहे. येथे भाजपाला सात तर जगताप गटाला पाच जागांवर विजय मिळाला आहे. सावंत गट या निवडणुकीत स्थानिक पातळीवर कोणत्याही पक्षाची मदत न घेता निवडणुकीत उतरला होता. सावंत यांनी विजयी मिळवला असला तरी शहरवासियांच्या विकासाबाबत त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यात सावंत गट भाजप की शिवसेनेची मदत घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘नगरपालिकेच्या निवडणुकीत सावंत यांनी शहराचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार’ असल्याचे सांगितले होते. अनेकदा विजयानंतर ‘तुम्ही कोणाची मदत घेणार असे प्रश्न करण्यात आले होते.’ मात्र ‘योग्यवेळी आम्ही आमची ताकद दाखवून निर्णय घेऊ’. मात्र शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सावंत सांगितत होते. अजूनही सावंत यांनी निर्णय जाहीर केलेला नाही.

निकालानंतर सुनील सावंत यांनी शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचीही बी भेट घेतली होती. त्यानंतर आता पालकमंत्री गोरे यांचीही त्यांनी भेट घेतली आहे. या भेटीवेळी दादासाहेब इंदलकर व भाजपचे सोलापूर पश्चिम जिल्हाचिटणीस विनोद महानवर उपस्थित होते. भेटीबाबत ‘काय सांगता’शी बोलताना सुनील सावंत म्हणाले, ‘पालकमंत्री गोरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. करमाळा शहराच्या विकासासाठी निधी देण्याचे’ त्यांनी अश्वासन दिले आहे. करमाळा नगरपालिकेत सावंत व भाजप एकत्र येणार का? या प्रश्नावर सावंत म्हणाले, ‘आम्हाला सर्व दारे खुली आहेत. शहराचा विकास करणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही स्थानिक पातळीवर आघाडी करून निवडणूक लढवली आहे. आम्हाला शहराचा विकास करायचा आहे. सर्वजण बसून यावर चर्चा होईल. सर्वांना विचारात घेऊनच यावर निर्णय होईल.’

सुनील सावंत हेच चेहरा?
करमाळा शहर विकास आघाडीच्या विजयात सावंत गटाचे सुनील सावंत यांचे योगदान महत्वाचे आहे. यामध्ये प्रत्येकानी आपापली जबाबदारी पार पाडली. त्यामुळे हा विजयी झाला असून याचे श्रेय स्वतः सुनील सावंत यांनी नागरिकांना दिले असले तरी सुनील सावंत यांनी उमेदवारी निवडण्यापासून विजयापर्यंत मांडलेल्या भूमिका महत्वाच्या ठरल्या आहेत. त्यामुळे करमाळा शहर विकास आघाडीचा चेहरा हा सुनील सावंत हाच असून ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *