करमाळा (सोलापूर) : ‘सामाईक जमिनीतील बांबूची झाडे न विचारता तोडून का विकली’ असे विचारले म्हणून भावाने मारहाण केल्याचा प्रकार मोरवड येथे घडला आहे. यामध्ये करमाळा पोलिसात लहान भावाच्या फिर्यादीवरून मोठ्या भावावर गुन्हा दाखल झाला आहे. गणेश धोंडिबा नाळे (वय ३५) यांनी यामध्ये फिर्याद दिली आहे. तर हनुमंत धोंडिबा नाळे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
मोरवड येथे नाळे यांची जमीन आहे. दोघेही भाऊ- भाऊ शेजारी राहतात. शुक्रवारी (ता. १०) दुपारी ४ वाजताच्या सुमारास फिर्यादी नाळे घरासमोर थांबले होते. तेव्हा गुन्हा दाखल झालेले नाळे त्यांच्या घरासमोर आले. तेव्हा त्यांनी ‘सामाईक जमिनीतील बांबूची झाडे न विचारता का विकली?’ असे विचारले असता त्याने ‘तू न्यायालयात दावा का दाखल केला?’ असे म्हणत शिवीगाळ करून हातात दगड घेऊन मारहाण केली. यात गणेश नाळे यांच्या डोक्याला मार लागला आहे.